ठाणे : एखाद्या कंपनीची वस्तू हुबेहुब बनवून ती विक्री करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. भिवंडीतील एका दुकानात अशाच प्रकारे टायटन, फास्ट्रॅक ब्रँडची बनावट घड्याळे विक्री होत असल्याचे समोर आले. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दुकान मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घड्याळ कंपनीच्या दिल्लीतील प्रतिनिधीने तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.
कंपन्यांच्या नावाने बनावट वस्तू तयार करुन त्याची विक्री अनेक ठिकाणी होत असते. काही ग्राहकांना वस्तू खरी असल्याची भासवून त्यांची फसवणूक केली जाते. तर काही प्रकरणात महागड्या वस्तू खरेदी करता येत नसल्याने ते कमी किमतीत मिळणाऱ्या बनावटी वस्तूंकडे आकर्षित होत असतात. ब्रँड वापरत असल्याचे त्यांच्याकडून दाखविले जाते. परंतु अशा बनावटी वस्तू विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.
भिवंडी येथील तीन बत्ती भागात टायटन, फास्ट्रॅक ब्रँडच्या बनावट घड्याळांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाली होती. या माहितीनंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी आणि भिवंडी शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित दुकानात प्रवेश करून छापा टाकला. त्यामध्ये लाखो रुपये किमतीची बनावटी घड्याळे आढळून आली. याप्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधीने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे, प्रतिलिपी अधिकाराचे अधिनियम १९५७ चे कलम ५१. ६३, ६५ तसेच व्यापार चिन्ह अधिनियम १९९९ चे कलम १०३, १०४ प्रमाणे दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.