लग्न, हळदी समारंभांमध्येही आवाज मर्यादेबाहेर; ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिसांकडे ९२ तक्रारी
कायदेशीर लढाई करत सार्वजनिक उत्सवांतील ध्वनिप्रदूषणाला आवर घालण्यात यशस्वी झालेल्या ठाण्यातील सुजाण नागरिकांना आता शहरातील घरगुती समारंभांतील दणदणाटाने हैराण करून सोडले आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने शहरात आयोजित होणाऱ्या लग्न तसेच हळदी समारंभांमध्ये ध्वनिप्रदूषणाचे र्निबध धाब्यावर बसवले जात असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे, ही परिस्थिती आजचीच नसून गेल्या तीन महिन्यांत ध्वनिप्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या १७५ तक्रारींपैकी तब्बल ९२ तक्रारी लग्न, हळदी यांसारख्या घरगुती सोहळय़ांमध्ये होणाऱ्या आवाजाच्या दणदणाटाबद्दलच्या आहेत.
उत्सवी उन्मादात ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडली जात असल्याने ठाणे शहरातील सुजाण रहिवाशांनी या ढणढणाटाविरोधात नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे गेल्या काही वर्षांत स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणांनीही यासंबंधी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या सजगतेमुळे गेल्या तीन महिन्यांत नागरिकांकडून ध्वनिप्रदूषणासंबंधी तब्बल १७५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ९२ तक्रारी या हळदी आणि लग्न समारंभात वाजविल्या जाणाऱ्या डीजे, लाऊडस्पीकर तसेच ढोलच्या आवाजाच्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली. ठाणे शहरातील उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात स्थानिक पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, घरगुती कार्यक्रमांमुळे शहरातील गोंगाटात भर पडत असताना गल्लोगल्ली ढणढणाटात साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमांना आवर घालणे पोलिसांच्याही आवाक्याबाहेर गेले आहे.
फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये ध्वनिप्रदूषाणाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे एखाद्या गल्लीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान ध्वनिक्षेपकाचा आवाज वाढू लागलाच तर पोलीस कर्मचारी दाखल होऊन आवाज कमी करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. असे असले तरी गेल्या काही महिन्यांत ग्रामीण परिसरात तसेच ठाण्यातील काही निम्नस्तरीय वस्त्यांमध्ये हळदीचा आवाज वाढल्याने त्यासंबंधीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे.
तक्रारींबाबत सजगता
यापूर्वी वर्षभरात ध्वनिप्रदूषणाच्या केवळ १० ते १५ तक्रारांची नोंद होत असे. मात्र ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी केलेल्या उत्सवातील ध्वनिप्रदूषणाच्या विरोधातील जनहित याचिकेमुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या प्रकरणी तक्रार करण्यास नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ध्वनिप्रदूषणाविरोधात तक्रारी करणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी थेट या प्रकाराविरोधात तक्रारी करण्यास सुरुवात केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हल्ली सर्वत्र हळदी समारंभाला डीजे वाजविणे सुरू आहे. मात्र आपल्या घरगुती कार्यक्रमामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याची काळजी सर्वानी घ्यावी. अशा प्रकारच्या उपद्रवांवर पोलिसांनी कणखर भूमिका घेऊन हे प्रकार थांबवावेत.
– डॉ. महेश बेडेकर, ध्वनिप्रदूषण विरोधक याचिकाकर्ते
