एन्जल डोसा कॉर्नर
द क्षिणेकडील खाद्यपदार्थ मुंबई-ठाण्याच्या खाद्यसंस्कृतीत इतके रुजले आहेत की, त्यांना वेगळं करणं अशक्य आहे. इडली, डोसा, मेदूवडा या पदार्थाशिवाय अनेकांची सकाळची न्याहरी पूर्ण होत नाही. बाहेर फिरायला गेलो तरी एखाद्या उडपी हॉटेलात शिरून अशा हेल्दी पण तरीही चटपटीत पदार्थावर आपण ताव मारतो. अलीकडे तर डोशाचे इतके प्रकार निघाले आहेत की, त्यांची नावेच जिभेवर पाणी आणतात. डोशांच्या अशाच अनेक प्रकारांची मेजवानी देणारे एक हॉटेल ठाण्यातील कोलबाड परिसरात लोकप्रिय ठरत आहे. ‘ऐंजल डोसा कॉर्नर’मध्ये तब्बल ५१ प्रकारचे डोसे चाखायला मिळतात आणि प्रत्येकाची चव वेगळी असते, हे सांगायला नकोच!
साधा डोसा, ओनियन डोसा, शेजवान डोसा, केरला डोसा, चटणी पावडर, साधा डोसा, चायनीज डोसा, चॉप्सी डोसा, स्पेशल गिनी डोसा, पनीर बुर्जी डोसा, भाजी बहार डोसा, पनीर चिली डोसा, मंच्युरियन डोसा, दिलखूश डोसा हे साध्या डोशामधील प्रकार. तसेच मसाला डोशामध्ये मसाला डोसा, म्हैसूर मसाला डोसा, पाव भाजी डोसा, शेजवान मसाला डोसा, त्याच प्रकारे पनीरमध्ये पनीर साधा डोसा, पनीर ओनियन सादा डोसा, पनीर शेजवान साधा डोसा, पनीर केरला साधा डोसा, पनीर चटणी पावडर साधा डोसा, पनीर चायनीज डोसा विथ न्यूडल्स, पनीर चॉप्सी डोसा, पनीर गिनी डोसा, पनीर मसाला डोसा, पनीर म्हैसूर डोसा, पनीर पाव भाजी डोसा, पनीर शेजवान मसाला डोसा अशा विविध प्रकारच्या डोशांची लज्जत येथे आहे. हल्ली चीज हा लहान मुलांचा आवडता पदार्थ बनला आहे. चिजचा वापर करून चीज साधा डोसा, चीज ओनियन साधा डोसा, चीज शेजवान साधा डोसा, चीज केरला साधा डोसा, चीज चटणी पावडर साधा डोसा, चीज चायनीज डोसा, चीज चॉप्सी डोसा, चीज गिनी डोसा आणि चीज मंच्युरियन डोसा अशा चिजी डोशांची कुरकुरीत मेजवानी येथे उपलब्ध आहे. तसेच उत्तप्पा हा आपल्याकडच्या आंबोळीशी नाते सांगणाऱ्या दाक्षिणात्य खाद्यपदार्थाचे प्रकारही येथे मिळतात. ओनियन उत्तप्पा, टोमॅटो उत्तप्पा, मसाला उत्तप्पा, म्हैसूर उत्तप्पा, पिझ्झा उत्तप्पा व व्हेजिटेबल उत्तप्पा असे उत्तप्प्याचे विविध प्रकार या कॉर्नरवर उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे पन्नासहून अधिक डोसे बनविणारी व्यक्ती मात्र महाराष्ट्रीय आहे. त्यांचे नाव एकनाथ मगर. सात-आठ वर्षांपूर्वी डोसा कॉर्नर सुरू केले. त्यापूर्वी त्यांनी भारतात ठिकठिकाणी आढळणारे डोसांचे प्रकार पाहिले. त्याची कृती समजून घेतली आणि ठाणेकरांसाठी तब्बल ५१ प्रकारचे डोसे देण्यास सुरुवात केली. ठाण्यात इतक्या विविध प्रकारचे डोसे मिळणारे हे एकमेव ठिकाण आहे. विशेष म्हणजे ते बाराही महिने एकही दिवस सुट्टी न घेता खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी सज्ज असतात. दुपारी तीन ते रात्री साडेअकरापर्यंत त्यांच्याकडे डोसे मिळू शकतात. खवय्यांना कॉर्नरवरच गरमागरम डोसे खाण्याची सोय आहे. त्याचबरोबरच पार्सल तसेच होम डिलिव्हरीही दिली जाते. ४० रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत हे डोसे उपलब्ध आहेत.
शलाका सरफरे
स्थळ- महावीर माइलस्टोन, विकास कॉम्प्लेक्स जवळ, रुनवाल नगर, ठाणे (प.)
वेळ – दुपारी ३ ते रात्री ११.३०