आलू पराठा, मेथी पराठा यांसारखे विविध पराठे मिरचीच्या ठेच्याबरोबर नाहीतर लोणच्याबरोबर आपल्याला खायला आवडते. नेहमीच भाजीपोळी खाण्यापेक्षा रोजच्यापेक्षा काही वेगळे म्हणून या दोघांचे मिश्रण असलेले विविध चवीचे पराठे आता घरोघरी बनविले जातात. वसईतील ‘ओम साई हॉटेल फेमस पराठा सेंटर’ हे खास पराठय़ांसाठी प्रसिद्ध आहे.

‘ओम साई हॉटेल फेमस पराठा सेंटर’ येथे नानाविध पराठय़ांची मेजवानी खवय्यांना मिळते. गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेले हॉटेल हे पराठय़ांसाठी प्रसिद्ध  वसईतील एकमेव असे हॉटेल आहे. अगदी वसईपासून ते विरापर्यंतचे ग्राहक या हॉटेलशी बांधले गेले आहेत. वसईतील खवय्यांना विविध प्रकारच्या पराठय़ांची चव चाखायला मिळावी या हेतूने सचिन गुप्ता यांनी आठ वर्षांपूर्वी हे हॉटेल सुरू केले.

सचिन यांनी आपल्या या हॉटेलमध्ये फक्त पराठय़ांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. ‘ओम साई हॉटेल फेमस पराठा सेंटर’मध्ये आपल्याला नेहमीच्या आलू, कोबी, मुळा, मेथी पराठय़ाबरोबरच चीज पराठा, कॉकटेल पराठा, आलूकांदा मिक्स पराठा, पनीर पराठा असे विविध प्रकारचे पराठे मिळतात. कांदा, बटाटा, मटार, कोथिंबीर, मटार आदी एकत्र करून बनविलेला येथील कॉकटेल पराठाही खासच म्हटला पाहिजे. येथील चीज, आलं, तिखट, मिरची टाकून केलेल्या चीज पराठय़ाची चव जिभेवर सतत रेंगाळत राहील अशी आहे. परंपरा आणि नावीन्य याचे मिश्रण करून पराठय़ाचे अनेक नवे प्रकार ‘ओम साई हॉटेल फेमस पराठा सेंटर’ने वसईकरांना उपलब्ध करून दिले आहेत.

पराठा म्हटलं की तोंडी लावायला दही किंवा चटणी हे दोनच पदार्थ आपल्याला माहिती असतात. मिरचीचा ठेचा, कैरी, कांदा, पुदिनाची चटणी, भाजी हे पदार्थ इथे आपल्याला पराठय़ाबरोबर चाखायला मिळतात. पराठा कितीही चविष्ट असला तरी अनेक खवय्यांचे जेवण त्यामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी भात लागतोच. भातासह मराठमोळ्या पद्धतीने बनवलेल्या विविध प्रकारच्या भाज्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. दुपारचे आणि रात्रीचे जेवण नेण्यासाठी खवय्यांची येथे रांग लागलेली दिसते. येथील खाद्यपदार्थाना स्वत: सचिन आणि त्यांची पत्नी उपासना यांच्या हाताची चव असते. यामुळे घरगुती खाद्यान्नाचा आस्वाद येथे आपणास मिळतो.

येथे कोणताही पदार्थ तयार करून ठेवला जात नाही. मागणी येईल त्याप्रमाणे पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे तुम्हाला नेहमी गरमागरम पदार्थच मिळतात. पराठय़ाचे मिश्रणही आधीपासून बनवून ठेवले जात नाही. भाज्याही अगदी ताज्या वापरल्या जातात. त्यामुळे गरमागरम आणि ताज्या भाज्यांपासून बनवलेल्या खमंग पराठे खाण्यासाठी ‘ओम साई हॉटेल फेमस पराठा सेंटर’ला पर्याय नाही.

पत्ता- ‘ओम साई हॉटेल फेमस पराठा सेंटर’, शॉप नंबर ९. न्यू सीमा अपार्टमेंट, समता नगर.

वेळ – सकाळी ११.३० ते दुपारी ३, सायं.७ ते रात्री १०.३०