शहापुर : शेतीचे काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विद्युत तारांचा झटका लागून मृत्यू झाला. सुरज जाधव (३१) असे शेतकऱ्याचे नाव असून या घटनेनंतर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. अखेर शहापुर तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.
शहापुर तालुक्याच्या वासिंद भागातील भातसई गावामध्ये शेतकरी सूरज सुनील जाधव राहत होता. मंगळवारी तो शेतात गेला होता. शेतातील विद्युत तारांमुळे त्याला विजेचा झटका लागला. त्याला तातडीने शहापुर उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सुरजचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांसह भातसई ग्रामस्थांनी घेतला होता. शहापुरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
मंगळवारी रात्री उशीरा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मृताच्या नातेवाईकांना नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. महावितरणच्या भोंगळ कारभारा संदर्भात वारंवार लेखी तक्रारी अर्ज केले होते. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.