किशोर कोकणे, लोकसत्ता

ठाणे : तलावपाली भागात सीगल पक्ष्यांवर ठाणेकरांकडून जीवघेणा प्रकार सुरू झाला आहे. या सीगल पक्ष्यांना ठाणेकर तेलकट किंवा त्यांच्या नैसर्गिक खाद्य पदार्थांव्यतिरिक्त इतर पदार्थ खाऊ घालत असल्याने या पक्ष्यांच्या ते जीववर बेतण्याची शक्यता पर्यावरणवादी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. वन विभाग तसेच पर्यावरण संघटनांकडून जनजागृतीकरून देखील हा प्रकार सुरूच असल्याचे चित्र आहे. सीगल पक्ष्यांना या खाद्य पदार्थ खाऊ घातल्याने चरबी वाढून त्यांना पुन्हा येथून स्थलांतरण करण्यास कठीण जाऊ शकते. त्यांच्या थव्यांतुन ते मागे पडल्यास त्यांची इतर शिकारी पक्ष्यांकडून शिकार होऊ शकते असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

थंडीपासून बचावासाठी लडाख, युरोप आणि सायबेरिया येथून सीगल पक्षी ठाणे खाडी परिसरात येत असतात. पूर्वी हे पक्षी खाडी किनारी थांबत असत. परंतु गेल्या चार वर्षांपासून काही सीगल हे तलावपाली येथे थांबू लागले आहेत. खाडी किनारे आक्रसू लागत असल्याने त्यांनी तलावपाली येथे येण्यास सुरुवात केली. तलावपाली परिसरात दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत मोठ्याप्रमाणात नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या सीगल पक्ष्यांना खाद्य पदार्थ टाकण्याचे काम काही नागरिकांकडून केले जात आहे. परंतु याचा दुष्परिणाम सीगल पक्ष्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना टाकले जाणारे पाव किंवा इतर तेलकट पदार्थ पचण्यास जड जातात. तसेच या पदार्थांमुळे त्यांच्या पोटात चरबी तयार होते. ऑक्टोबर पासून दाखल होणारे हे पक्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात त्यांच्या प्रदेशांत निघून जाण्यास सुरूवात होते. या खाद्य पदार्थांमुळे पक्ष्यांना ऊर्जा मिळत नसते. उलट चरबी वाढल्याने त्यांना उडण्यास त्रास होतो. अतिरिक्त चरबीमुळे अनेकदा पक्षी थव्या तून मागे पडतात किंवा जखमी होतात. या दरम्यान शिकारी पक्षी त्यांना भक्ष बनवतात असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले.

आणखी वाचा-ठाणे : खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची लाचेची मागणी

हे निकृष्ट दर्जाचे खाद्य पदार्थ पक्ष्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. नागरिकांना खाद्य पदार्थ टाकू नये असे सांगून देखील काहीजण खाद्य पदार्थ टाकतात. या खाद्य पदार्थांमुळे तलाव देखील दुषित होत असते. पक्ष्यांच्या पोटात या पदार्थांमुळे चरबी निर्माण होते. -रोहीत जोशी, पर्यावरवणवादी कार्यकर्ते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीगल पक्ष्यांना खाद्य पदार्थ खाऊ घालणे हा गुन्हा आहे. याबाबत जनजागृती करण्यात आली होती. परंतु नागरिकांकडून उल्लंघन होत आहे. येत्या काही दिवसांत पुन्हा जनजागृती कार्यक्रम हाती घेतले जातील. -दिनेश देसले, वनक्षेत्रपाल, वन विभाग.