ठाणे : राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत अधिवेशन सुरु असताना जंगली रम्मी हा पत्त्यांचा गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. यानंतर राज्यात मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मंत्र्यांची ही ऑनलाईन गेम खेळण्याची री ओढत आता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महिला बालविकास विभागातील उच्चपदस्थ महिला अधिकारी या आपल्या कार्यालयीन वेळेत माजॉन्ग सॉलिटेअर हा ऑनलाईन गेम खेळत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे जिल्हा महिला बालविकास सारख्या महत्वाच्या विभागाचे अधिकारीच कार्यालयीन वेळेत असे ऑनलाईन गेम खेळत असल्याने अधिकाऱ्यांच्या कामकाज पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ऑनलाईन गेमिंगचे व्यसन हे तरुणांमध्ये अधिक दिसून येते. यामध्ये जंगली रम्मी, पबजी, सॉलिटेअर, कॅरम, लुडो यांसारखे अनेक खेळ प्रतिस्पर्ध्यांसमवेतऑनलाईन पद्धतीने खेळता येतात. यामुळे अनेक जण विविध ठिकाणी हे गेम इंटरनेटच्या मदतीने खेळतात. लोकलगाड्यांमधुन नियमित प्रवास करणारे प्रवासी आपल्या मित्रांसमवेत अनेकदा असे गेम खेळताना दिसून येतात.

मात्र अनेकदा या ऑनलाईन गेमवरून भांडणे देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर जंगली रम्मीसारख्या खेळांमुळे अनेकजण कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची देखील काही प्रकरणे उघड झाली आहेत. यामुळे यांसारख्या अनेक ऑनलाईन गेमिंग वर बंदी घालण्याची मागणी विविध स्तरांतून अनेकदा केली जाते. असे असतानाच आता जिल्हा प्रशासनातील अधिकारीच ऑनलाईन गेम खेळत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गेम खेळणारे अधिकारी विवादित

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा महिला बालविकास विभागातील उच्चपदस्थ महिला अधिकारी या आपल्या कार्यालयीन वेळेत माजॉन्ग सॉलिटेअर हा ऑनलाईन गेम खेळत असल्याचे उघड झाले आहे. गेम खेळत असलेल्या संबंधीत अधिकारी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. उल्हासनगर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातून आठ मुलींनी पळ काढला होता. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडेच या वसतिगृहाचे देखरेखीचा पदभार होता. तर यातील मुलींनी या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी देखील या महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे आता आपल्या कार्यालयीन वेळेत गेम खेळल्यावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.