२,६१३ बचत गटांना ७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप
निखिल अहिरे
ठाणे : करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका जिल्ह्यातील अनेक लघु उद्योगांना बसला. जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात महिला बचत गटांचे मोठे जाळे पसरले आहे. या महिला बचत गटांचेही करोना काळात आर्थिक गणित कोलमडले होते. जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आर्थिक वर्षांत २,६१३ बचत गटांना ७५ कोटी रुपयांचे कर्ज स्वरूपात आर्थिक साहाय्य मिळाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांच्या माध्यमातून मिळालेल्या या आर्थिक साहाय्यामुळे बचत गटांना एक उभारी मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या १० हजार ६०८ महिला बचत गट कार्यरत असून एक लाखापेक्षा अधिक महिला या गटांशी जोडल्या गेल्या आहेत. राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियाना अंतर्गत बचत गटांसाठी विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. या अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना विविध लघु उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याबरोबर प्रशासनाच्या वतीने आर्थिक साहाय्य देण्यात येते. या आर्थिक मदतीने बचत गटांतील महिला शेळीपालन, कुक्कटपालन, शेती, शिवणकाम, खानावळ, खाद्य पदार्थाच्या गाडय़ा, मसाले, पापड, लोणची तयार करणे तसेच विविध शोभेच्या वस्तू बनविणे यांसारखे लघु उद्योग सुरू करतात. मागील वर्षांत जिल्ह्यातील २,६१३ बचत गटांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७५ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने मिळालेल्या या आर्थिक साहाय्यामूळे करोना काळात आपल्या लघु उद्योगाची घडी विस्कटलेल्या बचत गटांना नव्याने उभारी मिळाली आहे.
बचत गटांना बँक सखींचा आधार
ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या बचत गटातील महिलांना बँकेतून कर्ज मिळावे, त्यांची बँकेतील कामे सोपी व्हावी यासाठी कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ या पाचही तालुक्यांमध्ये ९७ बँक सखींची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये अंबरनाथ १७, कल्याण २६, मुरबाड २८, भिवंडी ४ आणि शहापूरमध्ये २२ बँक सखींची त्या भागातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. बचत गटाशी निगडित असलेल्या महिलांना बँक संदर्भातील सर्व कामे पूर्ण करण्यास या बँक सखींद्वारे साहाय्य केले जाते.
टाळेबंदीमुळे अनेक बचत गटांचे आर्थिक गणित कोलमडून पडले होते. बचत गटाशी निगडित महिलांचे लघु उद्योग पुन्हा सुरू व्हावे त्यांना एक रोजगार उपल्बध व्हावा या दृष्टीने मागील वर्ष भराच्या कालावधीत बचत गटांना ७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
– सारिका भोसले, जिल्हा अभियान व्यवस्थापक, ठाणे</p>