रोकड वाचवण्यास अग्निशमन यंत्रणेला यश

भाईंदर : भाईंदर पूर्व परिसरातील गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या कॅनरा बँकेला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने तात्काळ अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्याने बँकेमधील रोख रक्कम जळण्यापासून वाचवण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले.

भाईंदर पूर्व परिसरातील गोल्डन नेस्ट परिसरात असलेल्या कॅनरा बँकेला मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास आग लागली. आगीचे प्रमाण वाढत जात असल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी या संदर्भात अग्निशमन दलाला माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानुसार दोनच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यात अग्निशमन दलाची एक गाडी उपस्थित होती. महत्त्वाची बाब म्हणजे बँकेमध्ये लागलेल्या आगीत बँकेतील रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जळण्याची शक्यता अधिक निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आगीवर अवघ्या पंधरा मिनिटांत नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त झाले. त्यामुळे बँकेतील फर्निचर आणि वातानुकूलन यंत्रणेचे नुकसान झाले असून कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.