ठाणे : शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचे रुग्ण आढळून येऊ लागले असतानाच, करोना आणि ‘एच ३ एन २’ अशा दोन्ही आजारांची लागण झालेल्या एका वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. यामुळे आठवडाभरात करोनामुळे मृत्यूची संख्या तीन इतकी झाली असून, ‘एच ३ एन २’ चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे शहराची आरोग्यचिंता वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, या वृत्तास ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी दुजोरा दिला आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा संसर्ग गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा वाढू लागला आहे. जिल्ह्यात करोना सक्रीय रुग्णसंख्या ३०६ इतकी झाली आहे. त्यापैकी २०६ रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रातील आहेत, तर कल्याण-डोंबिवली शहरात २५, नवी मुंबई शहरात २८, उल्हासनगर शहरात ३, भिवंडी शहरात १८, मिरा-भाईंदर शहरात १० आणि ग्रामीण भागात १६ इतके सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत आघाडीवर असलेल्या ठाणे शहरात गेल्या आठ दिवसांत दोन वृद्धांचा मृत्यू झालेला असून, त्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका ७९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना सहव्याधी होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांना ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराचीही लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालातून उघड झाले होते. त्यामुळे आठवडाभरात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तीन इतकी झाली असून त्याचबरोबर ‘एच ३ एन २’चा पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा – जुन्या कळवा पुलाच्या दुरुस्तीस सुरुवात; पूल पूर्ण झाल्यास होणार एकेरी पद्धतीने वाहतूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – KDMC Budget : आरोग्य, कचरामुक्तीमधून शहर सुदृढतेवर भर; आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रस्त्यांपेक्षा भवन, स्मारक बांधणीवर जोर

ठाणे शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याबरोबरच ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराने डोके वर काढले असून, या आजाराचे आत्तापर्यंत १९ रुग्ण शहरात आढळून आलेले आहेत. त्यातच बुधवारी या आजारामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.