बदलापूर : रविवारी मासळी बाजारात माशांच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली. शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असून यापूर्वीचा रविवार मांसाहार करून साजरा करण्यासाठी खवय्यांनी मासळी बाजारात मोठी गर्दी केली होती. तर वाढलेल्या दराने खवय्यांच्या खिशाला मोठा फटका बसला. वाम मासा तब्बल १ हजार ८०० रुपये किलो तर सुरमई मासा १ हजार ४०० रुपये किलो दराने विकला जात होता. बदलापूर, अंबरनाथ शहरात हा दर होता. आसपासच्या शहरातही हाच दर पाहायला मिळत होता.

श्रावण महिना सुरू झाला की महाराष्ट्रात विशेषतः मुंबई महानगर परिसरात मांसाहार टाळला जातो. त्यामुळे दीप अमावास्या हा दिवस गटारी म्हणून गेल्या काही वर्षात साजरा केला जाऊ लागला. त्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मित्र परिवारासोबत मज्जा मस्ती केली जाते. मांसाहार हा यातला महत्वाचा घटक असतो. काही जण घरीच हा दिवस साजरा करतात. गेल्या काही वर्षात दीप अमावास्या पूर्वीच्या रविवारी मांसाहाराला प्राधान्य देतात. त्यातही माशांवर ताव मारला जातो. मुंबई बंदर जवळ असल्याने या भागात ताजा मासा उपलब्ध होतो.

मुंबई बंदरातून उपनगरात वाम, सुरमई, बांगडा, कोळंबी, झिंगा, रावस, पापलेट, पोपट, हलवा, ओले बोंबील असा मोठा पर्याय खवय्यांना असतो. महत्वाच्या क्षणी सुरमई आणि वाम माशाला मोठी पसंती दिली जाते. श्रावण महिना सुरू होण्या आधीचा शेवटचा रविवार असल्याने मासळी बाजारात मोठी गर्दी पहायला मिळाली. बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या शहरांमध्ये मासळी बाजार गर्दीने ओसंडून वाहत होते. मात्र यंदाच्या रविवारी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविवारी जवळपास सर्वच मासळी बाजारामध्ये माशांचे दर गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. वाम मासा तब्बल ४५० रुपये पाव अर्थात एक हजार ८०० रुपये प्रति किलो तर सुरमई मासा ३५० रुपये पाव किलो अर्थात एक हजार ४०० रुपये प्रति किलो दराने विकला जात होता. बोंबील, कोळंबी, पापलेटचे दरही गेल्या आठवड्याच्या तुलनेत १०० ते १५० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. पर्यायाने अनेकांनी मटण आणि चिकन कडे आपला मोर्चा वळवला. माशांच्या दरात येत्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.