मासेमारी बंदीच्या काळात मच्छीमारांचा दिनक्रम

मत्स्यप्रजाननासाठी १ जूनपासून मासेमारी बंद करण्यात आल्याने मासेमारी करणाऱ्या बोटी आता किनाऱ्यावरती विसावल्या आहेत. मासेमारी बंदीच्या कालावधीत मच्छीमार खाडीच्या पाण्यातील लहान माशांवर भर देतात. बोटींची डागडुजी, दुरुस्ती करण्याकडे त्यांचा कल आहे. या कालावधीत अनेक मच्छीमार देवदर्शन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रमांवर भर देत असल्याचे दिसून आले आहे.

सध्या वसई, पाचूबंदर, अर्नाळा, कळंब, राजोडी, मर्सेस, खोचिवडे, पाणजू या भागांतील मच्छीमारांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर लावल्या असून मच्छीमारीसाठी उपयोगात येणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्याच्या कामाला मच्छीमार लागले आहेत. मासेमारी बंदी होण्याआधी जास्तीची मासेमारी करून तिचा साठा करतात आणि पावसाळ्यात तिची विक्री करतात. मासेमारी बंदीच्या काळात मासेमारी पूर्णत: बंद असली तरी किनारपट्टी परिसरात म्हणजेच खाडीत मासेमारी करण्यास मच्छीमार प्राधान्य देतात. किनाऱ्यावर व खाडीत त्यांना जीळे, मोरी, निवटे यांसारखी मासळी उपलब्ध होते, त्याशिवाय खेकडे, चिंबोरी पकडून त्यांची विक्री करण्यावरही त्यांचा भर असतो.

बंदीच्या कालावधीत मासेमारीसाठी जाळी विणणे, बोटीची डागडुजी करणे याकडे त्यांचे विशेष लक्ष असते. काही मच्छीमार चारधाम, अमरनाथ, मद्रास येथील वेलंकनी माता मंदिर अशा तीर्थयात्रा करण्यास प्राधान्य देत असल्याचे नायगाव येथील मच्छीमार रमाकांत कोळी यांनी सांगितले.