आर्थिक व्यवहार ठप्प; मासे स्वस्तात विकण्याची वेळ

केंद्र सरकारने चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह मच्छीमारांनाही बसला आहे. मच्छीमारांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून मासे स्वस्तात विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

पावसाळ्यानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात बऱ्यापैकी मासळी मिळत असल्याने त्यांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले होते. मासळीला मागणी वाढत असतानाच सरकारने ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने त्यांच्या व्यवहारात विघ्न आले आहे. वसईतील मच्छीमारांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु नवीन आलेल्या दोन हजारांच्या नोटांचे सुटे पैसे आणि जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाला आहे. वसई किनारपट्टय़ातील २० ते २५ गावांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. येथील मच्छीमारांची लोकसंख्या भरपूर आहे. येथील हजारच्या आसपास कुटुंबे प्रत्यक्ष मासेमारी करतात, तर आणखी कुटुंबे मासेमारीशी संबंधित व्यवसायांत आहेत. समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका फेरीसाठी ४० ते ५० हजार खर्च करून जावे लागते. त्यात गेलेल्या बोटीचा खर्च तसेच बोटीवर काम करणाऱ्या खलाशांचा पगार हा खर्च येतो. नोटा रद्दच्या निर्णयानंतर तीन ते चार दिवसांनंतर मासेमारी करून येणाऱ्या बोटीतील माशांना बाजारभावाचा फटका बसणार आहे. यंदा पाऊस लांबल्याने मासेमारी उशिरा सुरू करण्यात आली होती, तसेच परतीच्या पावसाने अगोदरच मच्छीमारांना सतावल्याने नुकसान झाले होते आणि आता सरकारच्या या निर्णयाचा फटका त्यांना बसत आहे.

ग्राहक आल्या पावली परत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वात जास्त फटका मासळी विक्रेत्या महिलांना बसत आहे. कारण मुळातच ५०० आणि हजाराच्या नोटा बंद झाल्या आहेत त्यात २००० रुपयांच्या नोटांचे सुट्टे पैसे उपलब्ध नाहीत. यामुळे ग्राहक आल्या पावली परतत असताना दिसत आहे, तर काही मासळी विक्रेत्या महिला स्वस्त भावाने मासळी विकत आहेत. त्यामुळे मासेमारीचा सर्वच खर्च निघत नसून उलट व्यवसायात आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी सरकारने लवकरात लवकर सुटे पैसे चलनात आणावे, जेणेकरून मच्छीमारांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी कोळी युवाशक्तीचे दिलीप माठक यांनी केली आहे.