|| किन्नरी जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे खाडीत ४०० पक्ष्यांची नोंद; यंदा प्रमाण जास्त असण्याचा अंदाज

गुजरात, राजस्थान आणि कच्छहून नोव्हेंबरमध्ये ठाणे, नवी मुंबई, मुंबईच्या खाडीकिनारी दाखल होणाऱ्या रोहित पक्ष्यांचे आगमन यंदा ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवडय़ात झाले आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्यांवर गुलाबी छटा पसरली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवडय़ातच तब्बल ४०० पक्ष्यांची नोंद झाली असून त्यामुळे यंदा या पक्ष्यांचा आकडा वाढणार असल्याचा अंदाज पक्षीप्रेमींकडून वर्तवण्यात येत आहे.

साधारणपणे हिवाळा सुरू झाल्यानंतर दाखल होणारे रोहित (फ्लेमिंगो) पक्षी यंदा उन्हाच्या झळा लागत असतानाच दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, मात्र उन्हाचा रोहित पक्ष्यांवर फारसा प्रतिकूल परिणाम होत नाही, असे पक्षी अभ्यासकांचे म्हणणे आहे. गतवर्षी गुजरात, राजस्थानमधील प्रजनन काळ लांबल्याने महाराष्ट्रात रोहित पक्ष्यांच्या आगमनास विलंब झाला होता. यंदा हे चित्र पालटले आहे. ठाणे, नवी मुंबईचे खाडीकिनारी या पक्ष्यांचे थवे उतरलेले दिसत आहेत. गेल्या वर्षी आलेले काही रोहित पक्षी माघारी गेले नसल्याचे पक्षीअभ्यासकांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त लडाख, चीन, सायबेरिया आणि युरोपीय देशांतून आलेले स्थलांतरित पक्षी ठाणे खाडीकिनारी दिसू लागले आहेत.

गुजरात, राजस्थान, कच्छ ही या पक्ष्यांची प्रजनन स्थळे आहेत. तेथील दलदलीत हे पक्षी घरटी बांधतात आणि त्यात अंडी घालतात. नोव्हेंबर महिन्यापासून तेथील पाण्याची पातळी कमी होऊ लागते. पाणी आटल्यावर हे पक्षी महाराष्ट्रात ठाणे, उरण, शिवडी येथील खाडीकिनाऱ्यांवर येतात. गेल्या वर्षी नोव्हेंबर उजाडला तरी ठाणे, नवी मुंबई, मुंबईच्या खाडीकिनारी रोहित पक्षी अतिशय तुरळक प्रमाणात दिसत होते.  मार्चमध्ये परतणारे रोहित २०१७ च्या ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातच होते, असे अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या रविवारी ठाणे खाडीत तब्बल ४०० रोहित पक्ष्यांची नोंद झाल्याचे पक्षीप्रेमी अविनाश भगत यांनी सांगितले. चिखल, दलदल ठाणे खाडीकिनारी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने येत्या काळात फ्लेमिंगोची संख्या वाढण्याची शक्यता पक्षीप्रेमींनी वर्तवली आहे.

सध्या खाडीकिनारी आगमन झालेले पक्षी

लिटिल स्टिन्ट, सॅन्ड प्लॉव्हर, ब्लॅक-टेल गॉडवीट, ब्लॅक हेडेड गल, ब्राऊन हेडेड गल, नॉर्थर्न शोवेलर, नॉर्थर्न पिनटेल, युरेशियन करलू, सॅन्डपायपर, टर्न, गोल्डन प्लॉव्हर इत्यादी

एरवी ऑक्टोबरमध्ये खाडीकिनारी रोहित पक्षी आढळत नाहीत. यंदा ते मोठय़ा प्रमाणात आल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. कडक उन्हात खाडीकिनारा या पक्ष्यांनी बहरला आहे. हे पक्षी खाडीकिनारी असलेल्या दलदलीत राहतात. पाय चिखलात रुतलेले असल्याने त्यांना उन्हाचा फारसा त्रास जाणवत नाही.     – डॉ. सुहास राणे, एसपीसीए रुग्णालय, ठाणे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flamingos bird
First published on: 19-10-2018 at 03:19 IST