|| प्रसेनजीत इंगळे

५०० बेकायदा प्रकल्पांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात:- वसई-विरार परिसरात अनेक भागांत पालिकेचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचा फायदा घेत बाटलीबंद पाण्याचा काळाबाजार   सुरू झाला आहे. वसई-विरार परिसरात शेकडो बेकायदा प्रकल्प शुद्ध पाण्याच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत.  या भागात ५००हून अधिक छोटे-मोठे बेकायदा प्रकल्प वसई राजरोसपणे सुरू असल्याचे उजेडात आले आहेत.

वसई-विरार परिसरातील अनेक चाळी, औद्योगिक वसाहतीत, छोटे गाळे यांच्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली हे बेकादा धंदे सुरू झाले आहेत. कूपनलिका, टँकर, विहिरीचे पाणी सिण्टॅक्सच्या टाकीत साठवून त्यात रसायने टाकून ते शुद्ध केले जाते. त्यानंतर ते बाटल्यांत भरून ३० ते ३५ रुपये दराने बाजारात विकले जाते. या प्लांटमध्ये कमालीची अस्वच्छता आहे. काही प्लांट गटाराच्या बाजूला आहेत. काहींनी पाण्याचे स्रोत शौचालयातून घेतले आहेत, तर काही बावखलांमधून छोटय़ा वाहिन्यांद्वारे पाणी घेतले जात आहे. काही प्रकल्पाच्या ठिकाणी कपडे धुणे, आंघोळ करणे असे प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत.

कंपन्यांच्या दर्शनीय भागावर कुठेही फलक नाही. आय.एस.आय.चे मार्क नाही, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डचा (बीआयएस) कोड नाही, तसेच अन्न व औषध विभागाची परवानगी नाही, तरीही केवळ पाणी शुद्ध असल्याचे भासवून शुद्ध पाण्याच्या नावाखाली पाण्यावर शेकडो कंपन्या  पैसे कमावत आहेत. वसई, विरार, नालासोपारा येथे कार्यरत आहेत. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) माहिती उघड केली आहे. ‘एफडीए’च्या माहितीनुसार  वसई-विरारमध्ये ३० ते ४० प्रकल्पांना परवाने देण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ५००हून अधिक प्रकल्प सुरू आहेत.  अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यापासून अतिसार, किडनीचे आजार होत असल्यामुळे नागरिकांनी याबाबत सावध राहावे, असे डॉ. ज्ञानेश्वर टिपरे यांनी सांगितले.

आम्ही कारवाई करत आहोत. काही बेकायदा प्रकल्प बंदसुद्धा केले आहेत, असे सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन ठाण्याचे प्रकाश वाघमारे यांनी स्पष्ट केले.

आम्ही काही वर्षांपासून सतत अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे अशा अनधिकृत पाण्याच्या प्रकल्पासंदर्भात तक्रारी करीत आहोत. अन्न व औषध प्रशासन आमच्या तक्रारीकडे कानाडोळा करते, सध्या वसई-विरार परिसरात ५००हून अधिक असे प्लांट चालू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.   – अपूर्वा दोशी, मुख्य सहायक, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटर असोसिएशन 

वसई-विरार महापालिकेने या सर्व प्लांटला नोटिसा दिल्या आहेत. त्यांच्या पाण्याचे नमुने तपासणी अहवाल आम्ही मागविले आहेत. तशी आम्ही काही प्लांटवर कारवाई केली आहे. पण खरी कारवाई ही अन्न व औषध प्रसाशानाकडून अपेक्षित आहे. – वसंत मुकणे, सहायक आयुक्त आरोग्य विभाग,पालिका.