५०० ते ६०० चाचण्यांची यंत्रणा उभारण्याची तयारी

ठाणे : राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून करोना प्रतिबंधक लशींची दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना उपनगरीय रेल्वे प्रवासातून मुभा दिली आहे. तसेच उपाहारगृहे, दुकानांना रात्री १० पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये गावी निघून गेलेले परप्रांतीय पुन्हा मुंबई-ठाण्याकडे वळू लागले आहेत. गेल्या १० दिवसांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील करोना चाचणी केंद्रावर दररोज ४०० ते ४५० प्रवाशांची करोना चाचणी होत आहेत. हे प्रमाण यापूर्वी दिवसाला ३०० ते ३५० इतके होते. हे प्रमाण दररोज वाढत असून परप्रांतिय येण्याची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने या ठिकाणी किमान ५०० ते ६०० चाचण्या होतील, अशी यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

काही परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या गावीच लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. त्यांची करोना चाचणी करणे बंधनकारक नाही. त्यामुळे मजुरांचा शहरात दाखल होण्याचा आकडा आणखी वाढलेला असावा, अशी माहिती ठाणे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली. करोनाची दुसरी लाट मार्च महिन्यात आल्याने राज्यात निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना उपनगरीय रेल्वेतून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. उपाहारगृहे आणि कंपन्यांना निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे टाळेबंदीप्रमाणे पुन्हा सर्व व्यवहार ठप्प होतील या भीतीने अनेक परप्रांतीय मजुरांनी त्यांच्या गावचा रस्ता धरला होता. दुसरी लाट ओसरत असताना र्निबधांमध्येही शिथिलता मिळू लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशींच्या दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना प्रवासास मुभा मिळणार असल्याचे जाहीर झाले. तसेच उपाहारगृहे, दुकान मालकांनाही रात्री १० पर्यंत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. याची माहिती मिळताच परप्रांतीयांनी पुन्हा मुंबई, ठाण्याची वाट धरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १० दिवसांत ३ हजार ९२१ जणांची करोना प्रतिबंधक चाचणी करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार लशींच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांची करोना चाचणी करणे बंधनकारक नाही. उत्तरेकडील राज्यांतून आलेल्या काही प्रवाशांच्या लशीच्या दोन मात्रा घेऊन पूर्ण झालेल्या आहेत. त्यांची चाचणी केली जात नसल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशी होते चाचणी

ठाणे रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी दाखल झाल्यानंतर ठाणे महापालिकेतील आरोग्य केंद्रातील कर्मचारी लांबपल्ल्यांची गाडी उभी असलेल्या फलाटावर जातात. त्यानंतर या गाडीतील प्रवाशांना करोना चाचणी करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस पुलावर आणले जाते. प्रवाशाकडे करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रांचे प्रमाणपत्र असल्यास त्याची चाचणी केली जात नाही.

मजुरांचे प्रमाण अधिक

मुंबई ठाण्यातील उपाहारगृहे, कंपन्या, दुकाने पूर्णपणे सुरू झालेले आहेत. या कंपन्या किंवा उपाहारगृहांमध्ये काम करणारे मजूर हे कुटुंब गावी ठेवून मुंबई, ठाण्यात राहतात. उपाहारगृहे, कंपन्या, दुकाने पूर्णपणे सुरू झाल्याने मुंबईत दाखल होणाऱ्या परप्रांतीयांमध्ये कुटुंबांपेक्षा मजुरांचे प्रमाण अधिक दिसत आहे.