scorecardresearch

ठाणे : फुलांच्या दरात वाढ ; गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलो मागे २० ते ३० रुपयांची वाढ

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक फुलांच्या दरात प्रति किलो मागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

ठाणे : फुलांच्या दरात वाढ ; गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलो मागे २० ते ३० रुपयांची वाढ
(संग्रहित छायाचित्र)

करोना प्रादूर्भाव ओसरल्यामुळे दोन वर्षानंतर गणेशोत्सवानिमित्त फुल बाजार बहरल्याचे चित्र आहे. ठाण्यातील फुल बाजारात नागरिक सकाळपासनू गर्दी करत आहे. यंदा फुले खरेदी करताना नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक फुलांच्या दरात प्रति किलो मागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. गेले दोन वर्ष करोना काळात फुल बाजाराला पाहिजे तसा उठाव नव्हता. त्यामुळे मोठ्याप्रमाणात उत्पादित झालेल्या फुलांचेही नुकसान झाले होते.

करोना प्रादूर्भावामुळे गेले दोन वर्ष सर्वच सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करावे लागले होते. या काळात सर्व धार्मिक स्थळेही बंद ठेवावी लागली होती. याचा फटका फुल विक्रेत्यांना बसला होता. प्रार्थनास्थळे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले. तसेच कार्यक्रम, सभा, समारंभ बंद असल्यामुळे याठिकाणी पुप्षगुच्छांसाठी लागणाऱ्या फुलांचा वापरही कमी झाला होता. त्यामुळे फुल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसह किरकोळ फुल विक्रेत्यांनाही याकाळात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा >>> मोबाईलच्या वापरावरुन कौटुंबिक संघर्ष ; रात्रभर मोबाईल हाताळण्यास न दिल्यामुळे पत्नीची पतीला मारहाण

यंदा करोना प्रादूर्भाव ओसरला असून निर्बंधांमध्येही शिथीलता मिळाली आहे. त्यामुळे यंदा बाजारात सण-उत्सवांची धामधुम पहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त ठाण्यातील बाजारपेठाही सजल्या आहेत. नागरिकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होऊ लागली आहे. ठाण्यातील फुल बाजारात यंदा फुलांची मोठी आवक झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात प्रति किलो मागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी १८० ते २२० रुपये प्रति किलोने विक्री केली जाणारे झेंडू, शेवंती आणि अष्टर फुले यंदा २०० ते २५० रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहेत. तर, ६० रुपये प्रति किलोने विकला जाणारा कापरी गोंदा यंदा ८० रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे.

दीड दिवसाच्या गणपतीला फुलांची सजावट

दीड दिवसाच्या गणपतीला खऱ्या फुलांची सजावट करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजारात चाफा, डेजी, गुलाब, जास्वंद, मोगरा या फूलांना मोठी मागणी आहे. यंदा बाजारात २०० रुपयांना ५० चाफा, १०० रुपयांनी डेजी फुलांची जुडी तर, ३२० रुपये प्रति किलोने गुलाबाची विक्री केली जात आहे.

यंदाचे फुलांचे दर

फुल             दर(प्रति किलो)

झेंडू              २०० ते २५०

शेवंटी             २०० ते २५०

अष्टर             २०० ते २५०

कापरी गोंदा             ८०

गुलाब             ३२०

मोगरा              ६००

मराठीतील सर्व ठाणे न्यूज ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flowers price increase by rs 20 to rs 30 per kg compared to last year zws

ताज्या बातम्या