ठाणे – येथील शास्त्रीय संगीताच्या वारसा जपणाऱ्या गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने ‘अर्पण’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सांगितीक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून गुरु-शिष्य परंपरा उलगडली जाणार आहे. यावेळी गुरुकुल प्रतिष्ठानच्या १७५ बासरीवादक शिष्यांची सामूहिक बासरीवादन होणार आहे. हा कार्यक्रम ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रविवार, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारी आणि नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणारी गुरुकुल प्रतिष्ठान ही संस्था ही विविध सांगितीक कार्यक्रमांचे आयोजन करित असते. यंदा ‘अर्पण’ या कार्यक्रमाच्या १३ व्या मैफिलीचे सादरीकरण केले जाणार आहे. गुरूंप्रती कृतज्ञता, संगीताप्रती समर्पण आणि संस्कृतीप्रती आदर या उद्देशाने ‘अर्पण’ कार्यक्रम पार पडतो. गुरुकुल प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित ही मैफिल युनियन बँक आणि अस्मि इंटेरियरच्या सहाकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
या मैफिलीत गुरुकुल प्रतिष्ठानच्या १७५ बासरीवादक शिष्यांची सामूहिक बासरीवादन होणार आहे. रागदारी आणि जुन्या-नव्या गाण्यांचा समन्वय यात असणार आहे. तसेच पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा पाद्यपूजन सोहळा देखिल यावेळी पार पडणार असून पंडित विवेक सोनार यांचा बासरी वादनाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानच्या कविता सोनार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
मागील दोन दशकांहून अधिक काळ ‘गुरूकुल प्रतिष्ठान’ ही संस्था शास्त्रीय संगीताचा वारसा जपत आहे. संस्थेच्या माध्यमातून नवनविन कलाकार तयार केले जात आहेत. यामध्ये नियमित रियाज शिबिरे, उगमसारख्या कार्यक्रमाच्या माध्यामातून कलाकारांना व्यासपीठावर सादरीकरणाची संधी, ज्येष्ठ कलाकारांच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, माय गुरूकुल ॲपद्वारे जगभरातील संगीत साधकांना मार्गदर्शन केले जाते.
कुठे असणार कार्यक्रम
बासरीवादनाचा अर्पण हा कार्यक्रम रविवारी, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे.