भूसंपादनातील दिरंगाईमुळे रेल्वे उड्डाणपुलास विलंब ; दिवा पूर्वेकडील इमारतींचे पाडकाम रखडले

आता भूसंपादनाच्या खोडय़ामुळे प्रकल्प आणखी काही वर्षांसाठी रखडण्याची शक्यता आहेत.

railway flyover
या ठिकाणी पूल उभारण्यास २०१३ मध्येच मंजुरी मिळाली होती.

ठाणे : दिवा रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पश्चिमेकडील भूसंपादनाच्या अडचणीमुळे रखडल्याचे चित्र आहे. पश्चिमेकडील भूसंपादन अद्यापही महापालिकेकडून झालेले नाही. वर्षभरापूर्वी ठाणे महापालिका प्रशासनाने दिवा पूर्वेकडील प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या इमारतींचे पाडकाम केले होते. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असा दावा केला जात होता. आता भूसंपादनाच्या खोडय़ामुळे प्रकल्प आणखी काही वर्षांसाठी रखडण्याची शक्यता आहेत.

दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पूल नसल्याने फाटकातून वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे दररोज मध्य रेल्वेच्या जलद आणि धिम्या मार्गिकेवरील वक्तशीरपणावर त्याचा परिणाम होतो. तसेच फाटक ओलांडताना रेल्वेगाडय़ांच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी पूल उभारण्यास २०१३ मध्येच मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर चार वर्षे केवळ रेल्वे आणि पालिकेतील विसंवादामुळे हा प्रकल्प रखडला. पाच वर्षांपूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यात आले. महापालिका प्रशासनाने पूर्वेकडील दिशेला २५हून अधिक इमारती रिकाम्या करून त्यांचे पाडकाम सुरू केले आहे. या ठिकाणी सेवा रस्ताही तयार केला जात आहे. मात्र पश्चिमेकडील भूसंपादनाचा पेच कायम आहे. येथील नागरिकांकडून जागेच्या मोबदल्याची मागणी अधिकची होत आहे. परंतु त्यांच्यासोबत वारंवार चर्चा सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाला पूर्णत्वास येण्यास आणखी काही वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुलाचा प्रकल्प

दिवा रेल्वे फाटक येथून ठाण्याच्या दिशेने १५ मीटर अंतरावर हा पूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील बांधकाम रेल्वेकडून तर, महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याचे बांधकाम ठाणे महापालिकेकडून सुरू होईल. त्यामुळे पूर्व आणि पश्चिमेला ये-जा करणाऱ्या गाडय़ांची वर्दळ रेल्वे पूलावरून सुरू झाल्यास रेल्वे सेवांना होणारा विलंब बऱ्यापैकी कमी होणार आहे. या संपूर्ण रस्त्याची एकूण लांबी २५० मीटर इतकी असणार आहे, तर रुंदी १२ मीटर इतकी असणार आहे. तर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अडीच फूट जागेत पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ तयार करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flyover work delay due to incomplete of land acquisition zws

Next Story
ठाणेकरांना शेतकऱ्यांकडून घरपोच फळे, भाजीपुरवठा
फोटो गॅलरी