फेरतपासणीत त्रुटी आढळल्यास उपाहारगृहांवर कारवाई; पावसाळ्यापूर्वीची खबरदारी

पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अन्नविषबाधेच्या घटना घडण्याची शक्यता वाढत असल्याने तसेच साथीच्या आजारांची लागण टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरन्टची तपासणी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त सुरेश देशमुख यांच्यासह शहरातील १० हॉटेल्स आणि रेस्टॉरन्टची पाहणी केली. दूषित पाण्यामुळे अन्नविषबाधेचे प्रकार टाळण्यासाठी ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. या वेळी आढळलेल्या त्रुटी लक्षात घेऊन त्यानुसार त्यांना सुधारणा नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांची झपाटय़ाने वाढ होत असते. त्यामुळे नागरिकांना या काळात स्वच्छ, सुरक्षित आणि भेसळ नसलेले खाद्यपदार्थ मिळणे आवश्यक असते. फेरीवाल्यांकडीलच नव्हे तर उपाहारगृहातील अन्नाची तपासणी करण्याची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याण, अन्न व औषध आयुक्त सुरेश देशमुख आणि त्यांच्या विभागाने ठाण्यात उपाहारगृहांची तपासणी केली. ठाणे शहरातील १० उपाहारगृहांची या वेळी सखोल तपासणी करण्यात आली. राम मारुती रस्त्यावरील शिवाप्रसाद हॉटेल, शिवसागर रेस्टॉरंट, टेंभी नाका येथील सुजय रिफ्रेशमेंट, अमोघ रेस्टॉरंट अ‍ॅण्ड बार, गोखले रोडवरील हॉटेल शिवसागर, तळमजला, स्टेशन रस्त्यावरील कुंजविहार रेस्टॉरंट, जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील हॉटेल ग्रीनगुरू, उथळसर येथील हॉटेल माय, तलाव पाळी येथील सीमा हॉटेल प्रा. लि. (नमस्कार), हॉटेल साईकृपा या हॉटेलच्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीदरम्यान या पथकाला आढळलेल्या त्रुटींच्या आधारे सर्वाना सुधारणा नोटीस पाठवण्यात येणार असून त्याची पूर्तता करून तसा लेखी अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची खातरजमा करण्यासाठी पुन्हा फेरतपासणी करण्यात येईल. फेरतपासणीमध्ये त्रुटीची पूर्तता झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित उपाहारगृहाचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील काळात हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, परमिट रूम, बीअर बार, चायनीज स्टॉलच्याही तपासण्या करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे कोकण विभागाच्या सहआयुक्तांनी दिली आहे.