निसर्गाचे ऋतुचक्र अविरतपणे फिरत असते. उन्हाळा सरला की पावसाळा येतो, पावसाळा जाता जाता काही काळ जाणवाणारा कडक उष्मा आणि मग येणारा हिवाळा अशा पद्धतीने निसर्ग आपला अवतार बदलत असतो. अलीकडच्या काळात हेऋतुचक्र काहीसे बिघडल्यासारखे दिसत आहे. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा ऱ्हास, अतिक्रमणे, नागरीकरण अशा एक ना अनेक कारणांना यासाठी जबाबदार धरले जाते. पण ही चर्चा केवळ मानवापुरतीच मर्यादित आहे. कारण प्राणी-पक्षी काही तक्रार न करता या बदलाशी स्वत:ला जुळवून घेत आले आहेत.  हिवाळ्याची चाहूल लागताच मुंबई-ठाण्याच्या खाडीकिनारी, समुद्रकिनारी अनेक नवनव्या पक्ष्यांचे थवे नजरेस पडतात.  अशा या परदेशी पाहुण्यांचा वेध..

स्थलांतरित पक्ष्यांची ‘आश्रयस्थळे’

Rahul Gandhi Wayanad Lok Sabha constituency human animal conflict LDF BJP
राहुल गांधींपेक्षा हत्तींनी जास्त भेटी दिल्या; वायनाड मतदारसंघामधल्या मतदारांची खंत
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

येऊर

ठाणे शहरातील येऊर हे ठिकाण सध्या पाटर्य़ा आणि वाढत्या नागरीकरणामुळे चर्चेत असले तरी नोव्हेंबर महिना सुरू झाल्यावर थंड वातावरणात अनेक पाहुणे पक्षी येऊरच्या जंगलाला भेट देतात. इतर वेळी फारशा ऐकू न येणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजात वेगवेगळ्या ठिकाणांहून स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांचा आवाजदेखील ऐकायला मिळतो. हिमालयाच्या उंच शिखरांवर वावरणारे आणि इतर देशांतून प्रवास करणारे शेकडो प्रजातींचे पक्षी हिवाळ्यात येऊरच्या जंगलामध्ये डेरा टाकून असतात. वैविध्यपूर्ण रंगसंगती, मनमोहक आवाज आणि देहबोलीतील चपळता या पक्ष्यांचे वैशिष्टय़ आहेत.

पक्षीनिरीक्षणाची वेळ

पक्षीनिरिक्षणासाठी सकाळची वेळ योग्य असली तरी दिवसभरात येऊरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहता येतात.

कसे जायचे?

ठाणे स्थानकाजवळील सॅटीस पुलावरून येऊर येथे जाणाऱ्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या बस उपलब्ध आहेत. येऊर परिसरात पोहोचल्यानंतर तेथून चालत पक्षीनिरीक्षण करता येते. अनेक संस्था या भागात पक्षीनिरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करत असून, त्यांच्या माध्यमातून अनेक पक्ष्यांचे दर्शन नागरिकांना घेता येऊ शकते.

येऊरमध्ये येणारे पक्षी

ग्रेटर स्पॉटेड इगल, ब्लॅकर्ड काईट, ट्रिपिपीट, ब्लॅक हेडेड बंटिंग, रोझी स्टारलिंग, सल्फर बेलिड वार्बलर, रेड ब्रेस्टेड फ्लायकॅचर अशा वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी येऊरच्या जंगलामध्ये पाहायला मिळतात.

गांधारी

कल्याण शहराला लागूनच ‘गांधारे’ हे गाव असून त्याच्या बाजूनेच ‘गांधारी’ ही नदी वाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून या नदीची पुरती दुरवस्था झाली आहे. नदी जरी दुरवस्थेत असली तरीही नदी परिसरात दिसणारे पक्षी मात्र येथील वैशिष्टय़ आहे. कल्याण परिसरात अधिवास असलेल्या रहिवासी आणि शेकडो मैलाचे अंतर ओलांडून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी पक्षीप्रेमींना नेहमीच भुरळ घातली आहे. गांधारे गाव आणि भिवंडी तालुक्यातील गावांना जोडणारा गांधारी नदीचा पूल ही पक्षीनिरीक्षणासाठी योग्य जागा मानली जाते.

पक्षीनिरीक्षणाची वेळ –

सकाळी ७ ते ९.३०-१०

कसे जायचे?

कल्याण रेल्वे स्थानकातून परिसरातील केडीएमटीच्या बस किंवा स्थानक परिसरातील शेअर रिक्षाचा प्रवास करून आधारवाडी चौक गाठावे. येथून सरळ आग्रवाल महाविद्यालया(गांधारी)कडे जाणारा रस्ता गाठावा. आग्रवाल महाविद्यालय सोडताच अवघ्या काही अंतरावर गांधारी पूल लागतो. गांधारी पूल आणि पुलाच्या पुढे नदीच्या समांतर असणाऱ्या रस्त्यावर पक्षीनिरीक्षण करता येते.

गणेश घाट

दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारा आणि कल्याण खाडीच्या बाजूचा गणेश घाटाचा परिसर पक्षीनिरीक्षणाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. नुसते कल्याण-ठाणे रस्त्यावरील दुर्गाडी किल्ल्याजवळच्या पुलावरून जरी प्रवास केला तरी अनेक स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.

पक्षी निरीक्षणाची वेळ –

या ठिकाणी दिवसभर स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात.

कसे जायचे?

कल्याण स्थानकातून शेअर रिक्षाने लाल चौकी आणि तेथून दुर्गाडी किल्ल्याच्या/खाडीच्या दिशेने जाणारा रस्ता गाठावा. खाडी परिसरातून ठाणे शहराच्या दिशेने जाताना गणेश घाट पूल लागतो.

गणेश घाट परिसरात आढळणारे स्थलांतरित पक्षी –

ब्राऊन हेडेड गल (तपकिरी डोक्याचा कीरव) आणि ब्लॅक हेडेड गल (काळ्या डोक्याचा कीरव) हे पक्षी पाहायला मिळत आहेत. भारतीय स्वर्ग म्हणून महती असणाऱ्या लडाखहून स्थलांतर करून हे पक्षी हिवाळ्यात या ठिकाणी दाखल होतात.

शिवमंदिर तळे, वडवली, बदलापूर (प.)

शिवमंदिर तळे हे बदलापूर पश्चिमेकडे असून या तळ्यावर हिवाळ्यात स्थलांतर करून आलेले अनेक पक्षी येतात. यात घाटांवर अन्य देशांतून आलेले पक्षी, हिमालय, आशिया येथून आलेले पक्षी हमखास दिसतात.

कसे जायचे?

बदलापूर रेल्वे स्थानकापासून हे तळे पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडून दहा ते वीस रुपयांत येथे रिक्षाने पोहचता येते, तर अंबरनाथहून येतानाच्या मार्गालगतच हे तळे आहे.

शिवमंदिर तळ्यावरील स्थलांतरित पक्षी

या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने येथे आढळून येतो तो, उंच व जांभळ्या रंगाचा पर्पल हेरॉन हा बगळा या तळ्यातले मासे खाण्यासाठी येतो. तसेच त्याच्या बरोबरीनेच येथे दिसतो तो लांब शेपटीचा ग्रे व्ॉगटेल. ग्रे व्ॉगटेल हा धोबी पक्षी असून हिमालयातून स्थलांतर करून या परिसरात येतो. येथील कीटकांवर तो आपली गुजराण करतो. या पक्ष्यांच्या सोबत येतात ती काळी – पांढरी कॉटन पिग्मी गूज ही बदके. आपल्या रंगासाठी प्रसिद्ध असलेली ही बदके जोडीने येथे येतात. यांच्यासोबत लाँग टेल श्रायिक म्हणजे खाटिक हा घाटावरून येणारा पक्षी तर एशियन पाईड स्टर्लिग ही काळी-पांढरी मैना येथे वास्तव्यास येते. तसेच ब्राँझ विंग जकाना, लिटल कॉरमोरंट, लेसार व्हिसलिंग डक्स, लिटल ग्रेब, ओपन बिल स्टॉर्क, शिक्रा, सँडपायपर, ब्लू किंगफिशर असे एकूण चाळीस जातींचे पक्षी येथे आढळतात.

डोंबिवलीतील ठिकाणे

रेती बंदर खाडी

डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्थानकापासून रेती बंदर खाडीकिनारी जाण्यासाठी शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. सकाळच्या मोकळ्या हवेत पायीही चालत जाता येते.

निळजे तलाव व खोणी तलाव

डोंबिवली पूर्वेला स्थानकाजवळ खोणी व निळजे गावात जाण्यासाठी स्थानिक निवासी बस तसेच वाशी पनवेल बसनेही प्रवास करत या गावांमध्ये पोहचता येते. तसेच शेअर रिक्षाचाही पर्याय उपलब्ध आहे. दोन्ही गावे जवळ असल्याने प्रवास करणे सोपे जाते.

भोपर टेकडी

डोंबिवली पूर्वेकडील भागात स्थानकातून भोपर येथे जाण्यास शेअर रिक्षा मिळतात. गावात गेल्यानंतर चालत जाऊन टेकडी गाठता येते.

पडले गाव

डोंबिवली स्थानकातून नवी मुंबईकडे जाणाऱ्या बसेसमधून शिळफाटा रोडवरून पडले गावात जाता येते.

डोंबिवलीतील स्थलांतरित पक्षी

नॉर्दन सोल्वर, पिनटेल डक, युरेशियन मार्शल हॅरिअर, एशियन ओपनबिल स्ट्रॉक, स्टेपी इगल, टॉनी इगल, ग्रेटेस्ट स्पॉटेड ईगल, बिल्ट डक, गुज ग्रेलाईट, गारगॅनी डक, हळद्या, गडवाल, बुटेड इगल.

पक्षीनिरीक्षणाची वेळ –

स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी साधारणत: सकाळची वेळ योग्य आहे. सकाळी ७ ते १० या वेळेत हे पक्षी येथे पाहता येतात. सायंकाळी सात नंतर हे पक्षी घरटय़ाकडे वळत असले तरी सायंकाळी प्रकाश कमी असल्याने सहसा ते पाहता येत नाहीत. त्यामुळे सकाळच्या वेळेत पक्षी पाहण्यास जावे.

पक्षी निरीक्षणाला जाताना गृहपाठ महत्त्वाचा

पक्षी निरीक्षणाला जाताना स्थलांतरित पक्षी ओळखण्यासाठी संबंधित विषयाचे पुस्तक प्रत्येकाने बाळगायला हवे. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनामुळे असे पक्षी ओळखता येतात. तज्ज्ञ मंडळी या पक्ष्यांच्या उडण्याच्या पद्धतीवरून या पक्ष्याची वैशिष्टय़े ओळखतात. काही वेळा आवाजावरून हे पक्षी ओळखले जातात. पक्ष्यांना ओळखण्याची नजर व्यक्तींकडे असावी लागते. कोणत्याही ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी जाताना पक्ष्यांचा अभ्यास करून गेल्यास निरीक्षण स्थळी गेल्यावर पक्षी निरीक्षणासाठी अडचण येत नाही.

शैलेंद्र पाटील, पक्षी अभ्यासक

स्थलांतरित पक्ष्यांची संख्या मोठी..

कल्याणच्या गांधारी परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे तब्बल १८० पक्षी वर्षभरात येताना दिसतात. हिवाळ्यामध्ये रहिवासी पक्ष्यांव्यतिरिक्त सुमारे ३० स्थलांतरित पक्षी येथे आल्याच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस शहरात होणारी अतिक्रमणे, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास चिंताजनक आहे. मातीचे उत्खनन, वृक्षतोड यामुळे निसर्गाचा ऱ्हास मोठय़ा प्रमाणात होत असून त्याचा विपरीत परिणाम येथील पक्षीजीवनावर होत आहे.

सुरेंद्र देसाई, सहसंस्थापक, मिडअर्थ

स्थलांतरित पक्ष्यांचे अधिवास सांभाळा..

हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे एक वेगळेच जग आहे. ऑक्टोबर महिना ओलांडला की हे पक्षी येण्यास सुरुवात होते. या पक्ष्यांचा येण्याचा आणि जाण्याचा काळ वेगळा असतो. डिसेंबर-जानेवारीत असे पक्षी बघण्याची योग्य वेळ असते. हे पक्षी आपापल्या अधिवासाच्या ठिकाणी युरोप, आशिया आदी भागांतून येतात. या अधिवासात घनदाट जंगल, पाणथळ जागा, खाडी किनारे असा भाग येतो. ठाणे पट्टय़ात पनवेलजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्य, कल्याण, दिवा येथील खाडी किनारे तसेच या भागांतील तळ्यांसारख्या ठिकाणी हे स्थलांतरित पक्षी आढळतात. या पक्ष्यांचे आपल्या भागातील अधिवास जपणे ही सध्या आवश्यक बाब असून आपल्या ठाणे भागातील रेती उपसा, बांधकाम क्षेत्र आदींमुळे या पक्ष्यांचे मूळ अधिवास धोक्यात आले आहेत. याचा परिणाम काही पक्षी ही स्थळे सोडून अन्य ठिकाणी जाण्यात होऊ शकतो. मात्र, अशा पक्ष्यांचे निरीक्षण करण्याची हिवाळा ही नामी संधी असून यंदा मी कच्छचे रण येथे ग्रे-हायपोकोलिअस या स्थलांतरित पक्ष्याचे निरीक्षण करण्यास जाणार आहे.

सुनील गुळवे, डोंबिवली, पक्षी निरीक्षक

विकासकामांमुळे पक्षी दुरावत आहेत..

डोंबिवलीमध्ये बांधकामे मोठय़ा प्रमाणावर होत आहेत. भोपर टेकडीवर चाळींचे मोठय़ा प्रमाणावर बांधकाम झालेले असल्याने येथे पक्षी पाहाण्यासाठी टेकडीही पार करून जावे लागते. निळजे व खोणी तलावाचे सुशोभीकरण झाल्याने येथेही पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. केवळ पडले गावामध्ये बऱ्यापैकी जंगल उरले असल्याने येथे स्थलांतरित पक्षी पाहाण्याचा आनंद घेता येतो.

विश्वास भावे, पक्षीमित्र

( संकलन – समीर पाटणकर,

संकेत सबनीस, किन्नरी जाधव, शलाका सरफरे, शर्मिला वाळुंज, श्रीकांत सावंत)