दहा गावांमध्ये पाण्याचा स्रोत उपलब्ध; पशू-पक्षी, गाईगुरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला
भिवंडी तालुक्यातील दुर्गम भागातील दहा गावांमध्ये वन विभागाच्या पुढाकाराने ३९ रानतळी खोदण्यात आली आहेत. डोंगर पायथ्याशी पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी ही तळी खोदण्यात आल्याने या सर्व तळ्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे परिसरातील गावक ऱ्यांसाठी, पशू-पक्षी, गाई-गुरांसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
वन विभागाचे उप वनसंरक्षक के.डी.ठाकरे यांच्या प्रयत्नांमधून जिल्हा विकास नियोजन समितीकडून वनतळी बांधण्यासाठी सव्वा कोटीचा निधी उपलब्ध झाला. हा निधी ठाणे वन विभागाने भिवंडी वन विभागाचे वन क्षेत्रपाल शिवराम वाळिंबे यांच्या स्वाधीन केला. वनतळी खोदण्यापूर्वी भिवंडी तालुक्यातील कोणत्या गावांना पाण्याची खूप गरज आहे, याचे प्राथमिक सर्वेक्षण विभागाकडून करण्यात आले. दुगाड, पारिवली, कुहे, घोटिवली, पिरजे, चिबीपाडा, लाखीवली, मोहिली, कांबे, कोळीवली या गावांना रानतळ्यांची गरज असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली.
निधी उपलब्ध असल्याने तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने पाणी कोठे उपलब्ध होऊ शकते, याचे अंदाज बांधून रानतळी खोदण्याची कामे सुरू करण्यात आली. दहा गावांमध्ये खोदण्यात आलेल्या ३९ रानतळ्यांमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला आहे.
या पाण्याचा उपयोग गावकरी घरगुती वापरासाठी, गाईगुरे पिण्यासाठी करीत आहेत. तसेच, काही ग्रामस्थांनी या तलावांच्या परिसरात भाजीपाल्याची लागवड सुरू केली आहे. भिवंडी तालुक्यातील अन्य दुर्गम भागातील गावे शासनाने अशा प्रकारची रानतळी आपल्या भागात खोदावी म्हणून प्रयत्न करू लागली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department of bhiwandi make 39 small water pond for bird
First published on: 13-04-2016 at 05:20 IST