डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करून डोंबिवली जवळील २७ गावांमधील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आम्ही हा पक्षप्रवेश करत असल्याचे प्रवेशुच्छुक कार्यकर्त्यांनी सांगितले.
कल्याण, डोंबिवलीत विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची जोरदार स्पर्धा भाजप आणि शिंदे शिवसेनेत सुरू झाली आहे. कल्याण, डोंबिवली पालिकेच्या आगामी निवडणुका विचारात घेऊन आपल्या पक्षात विविध भागात तगडे कार्यकर्ते असावेत असा विचार करून फोडाफोडी करून भाजप, शिंदे शिवसेनेने इतर पक्षांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. भाजपने शिंदे शिवसेनेचे आणि शिंदे शिवसेनेने भाजपचे कार्यकर्ते फोडू नयेत हे तत्व या फोडाफोडीसाठी दोन्ही पक्षांकडून पाळले जात आहे.
या तत्वामुळे डोंबिवली पश्चिमेतील भाजपच्या एका बहुचर्चित शिंदे शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेवक पती, पत्नीचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेतील प्रवेश रखडला असल्याची चर्चा आहे. या नगरसेवकाने दोन वर्षापासून राजीनामा नाट्य करून भाजपला जेरीस आणले आहे. हा नगरसेवक आताही भाजपमध्ये असला तरी भाजपचे कमळ चिन्ह आपल्या पक्ष कार्यालयाच्या फलक, जाहिरात फलकावर लावत नसल्याची चर्चा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत यासंदर्भात कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक प्रेमा प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, माजी नगरसेविका शैलजा भोईर यांचा समावेश आहे. याशिवाय ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख मुकेश पाटील, तालुकाप्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, कोळेगावचे सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांचा समावेश आहे.
ठाण्यातील या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी कौटुंबिक नाते प्रत्येकजण जपत होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात हे पदाधिकारी काम करतात. आज वारकरी संप्रदायाचे देखील लोक आज शिवसेनेत सहभागी झाले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सखाराम पाटील, गजानन मांगरुळकर, संजय गायकर, घारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, गौरव ठाकूर, छाया काळे, वारकरी सांप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर, विश्वनाथ रसाळ, हेदुटणेचे सरपंच रामदास काळण, हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणूक काळात ठाकरे गटात असुनही खासदार शिंदे यांच्या प्रचाराचे काम अडचणीची बांधकामे रडारवर आल्याने उघडपणे केले होते, अशी त्यावेळी चर्चा होती.