ठाणे : कमी कालावधीत चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून राज्यभरातील १० हजारहून अधिक गुंतवणूकदारांची सुमारे २२ ते २३ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अरुण गांधी (७५) याला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने नुकतीच अटक केली आहे. त्याच्या चार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

ठाणे येथील सुभाषनगर भागात राहणाऱ्या अरुण गांधी याने सुमारे १० वर्षांपूर्वी कलीकाई अ‍ॅग्रो मल्टी स्टेट को. ऑ. सोसायटी नावाने कंपनी सुरू केली होती. काही साथीदारांच्या माध्यमातून त्याने काही योजना तयार केल्या होत्या. एक वर्ष गुंतवणूक केल्यास किंवा साखळी पद्धतीने गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशा वेगवेगळय़ा योजनांचा समावेश होता.

कल्याण येथे राहणाऱ्या एका ५७ वर्षीय महिला आणि तिच्यासोबत तिच्या परिचयातील काही जणांनी साखळी पद्धतीने या कंपनीमध्ये ३५ लाख ३८ हजार ३५० रुपयांची गुंतवणूक केली होती. अनेक महिने उलटूनही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी सुमारे वर्षभरापूर्वी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे अरुण गांधी याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. दरम्यान या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अरुण गांधी याला नुकतीच अटक केली आहे. त्याची चौकशी केली असता त्याने राज्यभरातील १० हजारहून अधिक गुंतवणूकदारांची २२ ते २३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

परताव्याचे प्रलोभन

आरोपीने १० वर्षांपूर्वी कलीकाई अ‍ॅग्रो मल्टी स्टेट को. ऑ. सोसायटी नावाने कंपनी सुरू केली होती.  त्याने काही योजना तयार करून गुंतवणूकदारांना अधिक परताव्याचे प्रलोभन दाखवून फसवले.