डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर गावमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाची आंबिवली मोहने येथील एका व्यक्ती आणि साथीदारांनी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ लाख ६७ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. नोकरी न लावता घेतलेले पैसेही इसमाने परत न केल्याने अखेर डोंबिवलीतील नागरिकाने संबंधितांविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी फसवणूक झालेल्या नागरिकाच्या तक्रार अर्जाची चौकशी करून वरिष्ठांच्या मंजुरीने संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. सप्टेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. सतीश बबन भोसले असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. ते यापूर्वी डोंबिवली पूर्वेतील नांंदिवली रस्ता भागात राहत होते. मोहने येथील सहकारनगर, साई सदन चाळीत राहणाऱ्या एका इसमाने आणि त्यांच्या साथीदारांनी ही फसवणूक केली आहे, असे तक्रारदार सतीश भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे. मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश भोसले यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण यापूर्वी डोंबिवली पूर्वेत नांदिवली रस्ता भागात राहत होतो. याठिकाणी राहत असताना मोहने आंबिवली भागात राहणाऱ्या एक इसम आणि त्यांच्या साथीदारांनी आपल्याशी परिचय करून आपला विश्वास संपादन केला. आपली वरिष्ठ पातळीवर ओळख आहे. आपण नोकरी लावण्याची कामे करतो असे तक्रारदार भोसले यांना सांगितले.

भोसले यांना आपण तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन, एन. टी. पी. सी. लिमीटेड, पत्रातु झारखंड याठिकाणी नोकरी लावतो असे आश्वासन दिले. या नोकरी लावण्याच्या बदल्यात मोहने येथील गुन्हा दाखल इसम आणि त्यांच्या साथीदारांनी सप्टेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत तक्रारदार सतीश भोसले यांच्याकडून आठ लाख ६७ हजार रूपये उकळले. हे पैसे स्वीकारल्यानंतर इसमांनी भोसले यांना स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली, पत्रातु झारखंड, एन. टी. पी. सी.ची बनावट कागदपत्रे देऊन आपणास नोकरी लागेल असा फक्त देखावा निर्माण केला. पैसे घेऊन पाच वर्ष झाली तरी आपणास नोकरी न दिल्याने तक्रारदाराने इसमांकडे घेतलेले पैसे परत करण्याचा तगादा लावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार मागणी करूनही इसमांनी पैसेही परत न केल्याने तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी या अर्जाची चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशावरून मोहने येथील फसवणूक करणाऱ्या इसम व साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ बनसोडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.