केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्याचा निर्णय ठाणे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने घेतला आहे. या निर्णयानुसार वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके आणि वृत्तपत्रे उपलब्ध करून दिली जाणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे या सुविधेचा जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच केंद्राचे कार्यालय असून तिथेच हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षेची पुस्तके व दैनिक वृत्तपत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, मात्र कार्यालयीन वेळेतच हे वाचनालय खुले असणार आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये मात्र हे वाचनालय बंद राहणार आहे. तसेच वाचनालयातील सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनी आणि सुशिक्षित बेरोजगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपलब्ध असलेल्या पुस्तकांची माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free library for competition test preparation in thane
First published on: 05-04-2016 at 00:52 IST