Manoj Jarange Patil Mumbai Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने निघालेले सतीश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेनंतर मराठा समाजाकडून हळहळ व्यक्त होत असून मुंबईतील आंदोलनदरम्यान, असा प्रकार घडू नये यासाठी ठाण्यातील डाॅक्टरांचे पथक आंदोलनस्थळी जाऊन समाज बांधवांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे काम करणार आहेत.

मराठा समाजासाठी ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या निर्णायक लढ्याला राज्यभरातून मराठा बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत असून, ठाण्यातील मराठा समाजही सज्ज झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठीचा आवाज ठाण्यातूनही बुलंद होणार आहे. या आंदोलनासाठी येणाऱ्या हजारो आंदोलनकर्त्यांच्या भोजन आणि पाणी व्यवस्था करण्याचा निर्णय ठाण्यातील मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

विशेषतः नाशिक मार्गे मुंबईत येणाऱ्या आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा ठाणेकर मराठा कार्यकर्त्यांकडून उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आनंदनगर, ऐरोली आणि चेंबर येथे जेवणाचे वाटपासाठी वाहने उभी केली जाणार आहेत. तर, पहाटे ६ वाजता आनंदनगर नाका येथे अल्पोहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिली.

आंदोलनकर्त्याचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी असलेले सतीश देशमुख हे मराठा आरक्षण आंदोलनात सक्रियपणे सहभागी होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने मराठा बांधव निघाले आहेत. त्यामध्ये सतीश देशमुख यांचाही समावेश होता. ते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे थांबलेले असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी संध्या, मुलगा प्रसाद आणि वृद्ध आई पुष्पा बाई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण समाजात शोककळा पसरली आहे.

ठाण्यातून डाॅक्टारंचा पुढाकार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेले सतिश देशमुख यांचा मृत्यु झाला. अशी घटना होऊ नये, यासाठी ठाण्यातील डाॅक्टरांची दोन पथक आंदोलनस्थळी जाऊन समाज बांधवांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे काम करणार आहेत. तसेच सध्या वातावरणातील बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा आजारपणामुळे किंवा आंदोलनादरम्यान, तणावामुळे कुणाला त्रास झाला तर त्याला तात्काळ प्राथमिक उपचार देण्याचे काम डाॅक्टर करणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी दत्ता चव्हाण यांनी दिली.