लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे: मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या बाजुला असलेल्या तीन हात नाका ते माजिवाडा जंक्शनपर्यंतचा सेवा रस्त्यांवर पार्किंग क्षेत्र निश्चित करून त्याठिकाणी मोफत वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार या रस्त्यावर ५० मीटर अतंरावर पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे तर, वळण रस्ता असलेल्या भागात वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत ही सुविधा ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात पुरेशा वाहनतळांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून पाऊले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोकळ्या जागेवर वाहनतळांची उभारणी केली जात आहे. शहरातील रस्त्यांवरही वाहनतळ उभारणीचा निर्णय पालिकेने यापुर्वी घेतला होता. यानुसार रस्त्यांचे वर्गीकरण करून त्याप्रमाणे पार्किंगचे दरही निश्चित केले होते. प्रत्यक्षात मात्र ही योजना अद्याप सुरु होऊ शकलेली नाही. असे असतानाच मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या बाजुला असलेल्या तीन हात नाका ते माजिवाडा जंक्शनपर्यंतचा सेवा रस्त्यांवर वाहने उभी करण्याची सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

आणखी वाचा-डोंबिवलीत चिंचोड्याचा पाडामध्ये रस्ता बंद करुन बेकायदा इमारतीची उभारणी, नागरिकांचा येण्याचा मार्ग बंद

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे वाहतूक शाखेचे अधिकारी यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत तीन हात नाका ते माजिवाडा जंक्शनपर्यंतचा सेवा रस्त्यांवर वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा आला आहे. या रस्त्यालगत जुन्या अधिकृत इमारती आहेत. त्यातील बहुतांश इमारतींमध्ये पुरेशा वाहनतळाची सुविधा नाही. त्यामुळे येथील रहिवाशी रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहने उभी करतात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी रस्त्याच्या एकाच बाजुला पार्किंग क्षेत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत. त्यानुसार या मार्गावर पार्किंग क्षेत्र निश्चित करून त्याठिकाणी फलक लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हि कामे लवकरच पुर्ण करण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत ही सुविधा ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

आणखी वाचा- ठेकेदारांच्या मनमानीमुळे कल्याण-डोंबिवली पालिकेत नालेसफाई कामांची नव्याने निविदा प्रक्रिया

काय आहे योजना?

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या बाजुला असलेल्या तीन हात नाका ते माजिवाडा जंक्शनपर्यंतचा सेवा रस्त्यांवर वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रस्त्यांच्या एका बाजुला पार्किंगची जागा निश्चित केली जाणार आहे. ५० मीटर अंतरावर पार्किंग क्षेत्र असणार आहे. या भागात काही ठिकाणी वळण रस्ते आहेत. याठिकाणी अपघातांची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई केली जाणार आहे. ही सुविधा मोफत असणार आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

मुंबई-नाशिक महामार्गालगत वाहनतळाची सुविधा उपलब्ध नाही. या मार्गालगत हॉटेल, गॅरेज, वाहन विक्रीच्या आस्थापना आहेत. या आस्थापनांची वाहने सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी करण्यात येतात. त्यामुळे त्यांच्यासाठीच तर ही योजना राबविली जात नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Free parking facility on service roads in thane scheme of thane municipal corporation mrj
First published on: 04-05-2023 at 17:41 IST