ठाणे : ठाण्यातील तरुण पिढीला वाचविण्यासाठी शहर हुक्का पार्लरमुक्त करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी लोकचळवळ यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठाणे शहराची प्रतिमा हुक्का पार्लर आणि डान्स बार संस्कृतीमुळे मलिन होत असल्याने आमदार संजय केळकर यांनी या विरोधात लोक चळवळ सुरू केली होती. या अवैध धंद्या विरोधात जागरूक नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर आमदार केळकर यांनी अधिवेशनात वाचा फोडली होती. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागालाही केळकर यांनी पाठपुरावा करून कारवाई करण्यास भाग पाडले होते. त्यानुसार या विभागाने अटी-नियमांचे पालन न करणाऱ्या ५१ बार-रेस्टॉरंटवर कारवाई केली होती. त्यानंतर शहरात हुक्का पार्लर सुरू असल्याचा आरोप होत आहे. या पर्शवभूमीवर आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यात त्यांनी शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी लोकचळवळ यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचे म्हटले आहे.
ठाणे शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असून हे माझे शहर आहे. या शहरातील तरुण पिढीला हुक्का तसेच पब अशाच्या आहारी जात असून त्यांना यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. ही ठाण्याची भावी पिढी आहे. त्यामुळे शहरातील हुक्का पार्लर तसेच इतर अवैध अवैध धंद्यावर प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केळकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच शेवटपर्यंत ही लढाई जागृत नागरिकांना सोबत घेऊन चळवळ उभारली जाईल आणि शहर हुक्का पार्लरमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.