ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठाण्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या गायमुख घाटाची पाहणी केली.

दुरवस्थेबाबत तातडीने उपायोजना करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तर रस्ते दुरुस्ती वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार ८ ऑगस्ट पासून येथील रस्ते वाहतूक अंशतः बंद करण्यात येणार असल्याचें जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर शुक्रवार ते रविवार असे सलग तीन दिवस २४ तास हे काम चालणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील विशेषत: घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुक कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. तर विद्यार्थ्यांच्या बसगाड्या देखील कोंडीत अडकतात. घोडबंदर भागात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे नागरिकांकडून आता प्रशासनावर टीका होऊ लागली आहे.

ठाण्यात होणाऱ्या कोंडीच्या मुद्द्यावरून सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा. तसेच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे आदेश दिले होते.

यानंतर लगेचच जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी गायमुख घाटात भेट देऊन पाहणी केली. रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार ८ ऑगस्ट २०२५ पासून रस्ते वाहतूक अंशतः ब्लॉक करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी एक बाजू सुरु ठेऊन दुसऱ्या बाजूचे काम केले जाईल. तर काम पूर्ण झालेली बाजू सुरु करून दुसऱ्या बाजूचे काम करण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मीरा भाईंदर बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वनविभाग अशा सर्व विभागांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून एकजुटीने या समस्येचे निराकरण पुढील पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीत करावे, अशा स्पष्ट सूचना देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.