BJP: ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली. त्याचा आनंद आहे. पण कमाविलेले टिकविता आले पाहिजे असे वक्तव्य भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते. या वक्तव्यानंतर शिंदे गटाकडून गणेश नाईक यांच्यावर टीका केली जात आहे. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी थेट गणेश नाईक यांच्या वयाचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यांचे वय झाल्याने ते काय बोलतात त्यांचे त्यांना माहित, असे म्हस्के म्हणाले होते. आता गणेश नाईक यांनीही नरेश म्हस्के यांना प्रत्युत्तर देत वयाचा आकडा काय असतो भविष्यात दाखवून देऊ असे म्हटले आहे. त्यामुळे नाईक विरुद्ध शिंदे गट असा नवा अंक ठाणे जिल्ह्यात सुरु झाला आहे.
पालघर येथे १५ ऑगस्टला एका शासकीय कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक संवाद साधत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन लाॅटरी मिळाल्याचे वक्तव्य केले होते. प्रत्येकाचे नशीब असते, लाॅटरी लागते की नाही. एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली, त्याचा आनंद आहे. पण कमविलेले टिकविता आले पाहिजे, असे माझे मत आहे. कसे कमविले, किती कमविले आणि कसे टिकविले यावर जनसामान्यांची नजर असते असाही उल्लेख त्यांनी केला होता.
या वक्तव्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका केली. लॉटरी कोणाला लागली? याचे आत्मपरीक्षण गणेश नाईक यांनी करावे. ‘साठी बुद्धी, नाठी’ असे म्हणतात, त्यांचे वय झाले आहे, त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांना माहिती असे म्हस्के म्हणाले.
गणेश नाईक काय म्हणाले?
वन मंत्री गणेश नाईक हे ठाण्यात एका कार्यक्रमात आले होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना विचारले असता, माणसाच्या वयाचा आकडा हे केवळ एक कारण असते. जो कार्यक्षम असतो, तो कायम दिसतो आणि भविष्यात ते दाखवून देऊ असे नाईक म्हणाले. भिवंडी, पालघर, वसई विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली, कल्याण ग्रामीण या सर्व ठिकाणच्या महिला कार्यकर्त्यांनी बुथस्तरावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणीस यांची कार्ये लोकांना समजून सांगितले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील महिला मनापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे उभ्या आहेत. परिणामी त्यांचे कार्य अधिक गतिमान शक्तिमान प्रकाशमान होण्यासाठी ते कारणीभूत ठरेल हा माझा विश्वास आहे असेही ते म्हणाले.