ठाणे – ठाणेकरांच्या सांस्कृतिक जीवनाचा हृदयस्पर्शी ठेवा म्हणजे राम गणेश गडकरी रंगायतन. नाटक, संगीत, कविसंमेलने आणि असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्रस्थान राहिलेल्या या रंगायतनाने ठाणेकरांच्या असंख्य आठवणी जपल्या आहेत. कालांतराने रंगायतनाची नव्याने निर्मिती झाली असली तरी जुन्या गडकरी रंगायतनाशी जोडलेले भावनिक नाते आजही ठाणेकरांच्या मनात कायम आहे. याच आठवणींना नवसंजीवनी देण्याचे काम ठाण्यातील क्षितिज दाते यांनी केले असून त्यांनी यंदा त्यांच्या घरच्या गणेशोत्सवाला गडकरी रंगायतनाची एक आकर्षक प्रतिकृती उभारली आहे. यातून त्यांनी जुने गडकरी रंगायतन साकारले आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक नागरिक आपल्या घरच्या गणेशोत्सवाला विविध सामाजिक संदेश देणारे देखावे उभारत असतात. याच पद्धतीने ठाण्यातील दाते कुटुंबीयांनी जुन्या गडकरी रंगायतनचे भव्य रूप आणि त्याभोवती गुंफलेले आठवणींचे धागे या साकारलेल्या देखाव्यात जिवंत झाले आहेत. ठाणेकरांनी दशकानुदशके ज्या रंगमंचावरून श्रेष्ठ नाट्यकृती, दर्जेदार संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक वैभव अनुभवले, त्या ठिकाणचे प्रतिबिंब क्षितिज दाते यांच्या कलाकृतीतून उभारण्याचे काम केले आहे.

ठाणे शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळखले जाणारे गडकरी रंगायतनाचे मागील काही आठवड्यांपूर्वीच नुतणीकरण करण्यात आले असून हे नाट्यगृह एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांसाठी खुले करून देण्यात आले आहे. यामुळे अधिक सुविधांनी युक्त अशा नाट्यगृहात नागरिकांना सध्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटक पाहण्याचा आनंद घेता येत आहे.

जुन्या गडकरी रंगायतनाची छबी पाहताना ठाणेकरांच्या डोळ्यांसमोर त्यांचे बालपण, या नाट्यगृहात तरुणपणात पाहिलेले नाटकं, कार्यक्रम आणि अविस्मरणीय क्षण पुन्हा जागृत होतात. त्यामुळे ही प्रतिकृती ठाणेकरांसाठी स्मरणरंजनाचा एक वेगळाच अनुभव ठरली आहे. कलात्मकता आणि भावनिकता यांचा सुंदर संगम असलेले हे काम ठाण्याच्या सांस्कृतिक इतिहासाला उजाळा देणारे ठरले असून क्षितिज दाते यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.