Thane ठाणे : संपूर्ण ठाणे शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु होती.अशातच एक बातमी आली शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत आनंद दिघे यांच्या गाडीचा अपघात झाला. दिघे यांच्यावर ठाण्यातील सिंघानिया रुग्णालयात उपचार सुरु होते. गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी बातमी येऊन धडकली दिघे यांच्या निधनाची. त्यानंतर, सिंघानिया रुग्णालय पेटवण्यात आले. ठाण्यात सर्वत्र शोककला पसरली आणि याच काळात गणेशाला निरोप देताना अनेक मंडळांनी स्वत: पुढे येऊन मिरवणूका काढायच्या नाहीत असा निर्णय घेतला. बुधवारी गणेशाचे आगमन होत असताना, यावेळी दिघे यांच्या मृत्यूला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हा त्या काळचा गणेशोत्सव अनेकांच्या नजरे समोरुन पुन्हा एकदा जागा झाला.

आनंद दिघे यांचा जन्म २७ जानेवारी १९५२ रोजी झाला. ठाण्यातील टेंभी नाका परिसरात ते राहत होते. याच भागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा नियमितपणे भरत असत. तरुण वयातच आनंद दिघे या सभांना उपस्थित राहू लागले आणि बाळासाहेबांचे प्रभावी वक्तृत्व तसेच तेजस्वी व्यक्तिमत्त्व यांच्याकडे ते आकर्षित झाले. त्यामुळे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला आणि १९७० च्या दशकात एका सामान्य कार्यकर्त्यापासून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली.

दिघेंच्या कार्यपद्धतीत प्रचंड झपाटलेपणा होता. त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडे पाठ फिरवली आणि लग्नही केले नाही. त्यांच्या निष्ठेमुळे आणि कार्यक्षमतेमुळे शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात एक पूर्णवेळ कार्यकर्ता मिळाला. त्यांच्या कामाची धडाडी पाहून पक्षाने त्यांना ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी दिली. जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांनी कौटुंबिक आयुष्यापासून स्वत:ला पूर्णपणे दूर केले. जिथे शिवसेनेचे कार्यालय असे, तिथेच ते राहायचे.

दिघे यांचा जिल्हाप्रमुख ते धर्मवीर प्रवास कसा होता ?

आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाका परिसरात ‘आनंद आश्रम’ची स्थापना केली होती. या आश्रमात दररोज सकाळी जनता दरबार भरायचा. परिसरातील लोक आपल्या अडचणी, समस्या घेऊन या दरबारात येत आणि आनंद दिघे त्या समस्या अतिशय तत्परतेने सोडवत असत. त्यांची काम करण्याची पद्धत नेहमीच थेट आणि कृतीशील होती .”बघतो”, “नंतर बघू” असे म्हणणे त्यांच्या स्वभावात नव्हते. जर तक्रार योग्य वाटली, तर ते संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ फोन करत आणि प्रसंगी काम होत नसल्यास कठोर पावले उचलायला मागेपुढे पाहत नव्हते. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांच्यात त्यांचा चांगलाच धाक होता. ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या. तसेच, स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनेकांना स्टॉल उभारून स्वयंरोजगाराची संधी मिळवून दिली. धार्मिक बाबतीत आनंद दिघे अतिशय श्रद्धाळू आणि कडक होते. त्यांनीच टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव आणि दहीहंडी सारख्या सार्वजनिक सणांची सुरुवात केली. त्यांच्या या धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना ‘धर्मवीर’ ही उपाधी मिळाली.

गणेशोत्सवात मंडळांना भेट देण्याची दिघेंची परंपरा

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांना तसेच काही कार्यकत्यांच्या घरगुती गणपतीला भेट देण्याची परंपरा दिघेंची होती. शहरातील प्रत्येक सार्वजनिक मंडळांना ते भेट देत असता. यासाठी मंडळातील पदाधिकाऱ्यांकडे दिघे कधी आणि किती वाजता येतील हे कळविले जायचे. मग, रात्रीचे १२ वाजलेले असो वा १ पण दिघे ठरलेल्या मंडळांना भेट देत असत. तसेच मंडळातले पदाधिकारी आणि सदस्य देखील दिघेंची वाट पाहत मंडळात बसत असायचे, अशी प्रतिक्रिया ठाण्यातील एका जुन्या मंडळातील ज्येष्ठ सदस्यांनी दिली.

२००१ साली गणेशोत्सवादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. जखमी आनंद दिघेंवर ठाण्यातल्या रुग्णालयात शस्त्रक्रियाही करण्यात आली, पण नंतर हृदयरोगाच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले.‘धर्मवीर आनंद दिघे यांचे निधन झाले, त्यावेळी ठाणे जिल्ह्यात आपल्या घरातल्या व्यक्तीचे निधन झाले असे काही चित्र होते. अनेक गणेश मंडळाचे मिरवणूक या टेंभी नाक्यावर यायच्या आणि आनंद दिघे हे त्यांचे स्वागत करायचे. मात्र, गणेशोत्सवाच्या काळातच त्यांचे निधन झाले आणि त्यामुळे अनेक मंडळांनी त्यावर्षी मिरवणूक रद्द केल्या. केवळ मंडळाचेच नव्हे तर, घरगुती गणपती ही मिरवणुकाविना विसर्जित करण्यात आले होते’, असे आनंद दिघे यांचे जवळचे सहकारी आणि ठाण्यातील ज्येष्ठ नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी त्यावेळची जुनी आठवण लोकसत्ताशी बोलताना सांगितली.