scorecardresearch

भुमीगत वाहनतळ प्रकल्पामुळे गावदेवी मैदान चार वर्षांपासून बंद ;  लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुर

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील हे एकमेव मैदान असून भुमिगत वाहनतळाच्या प्रकल्पामुळे मैदान नष्ट होणार

भुमीगत वाहनतळ प्रकल्पामुळे गावदेवी मैदान चार वर्षांपासून बंद ;  लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुर
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : ठाणे स्थानक परिसरातील गावदेवी मैदानात भुमिगत वाहनतळ लवकरच खुले होणार असल्याचे दावे पालिका प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी, या वाहनतळावरील मैदान मात्र अद्याप पुर्ववत झालेले नाही. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील हे एकमेव मैदान असून ते गेले चार वर्षे भुमिगत वाहनतळाच्या कामामुळे बंद आहे. आता वाहनतळाचे काम पुर्ण झाले असले तरी ते अद्याप मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे. तसेच पालिकेच्या कारभारावर टिका होऊ लागली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन त्यात मैदान खुले करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसामुळे मैदान पुर्ववत करणे शक्य होत नसूुन पाऊस थांबताच हे काम हाती घेऊन पुर्ण केले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे स्थानक परिसरात पुरेशा वाहनतळाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिक रस्त्याच्याक़डेला बेकायदा वाहने उभी करतात. या वाहनांमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने गावदेवी मैदानात भुमिगत वाहनतळ उभारणीचा निर्णय घेऊन त्याचे काम सुरु केले होते. स्मार्ट सिटी योजनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. परंतु ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील हे एकमेव मैदान असून भुमिगत वाहनतळाच्या प्रकल्पामुळे मैदान नष्ट होणार असल्याची भिती व्यक्त करत नागरिकांनी प्रकल्पास विरोध केला होता. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. पालिकेने न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात वाहतळाच्या वरती मैदान विकसित केले जाणार असल्याचे पालिकेने म्हटले होते. दोन वर्षात या प्रक्लापाचे काम पुर्ण होणार असल्याचेही म्हटले होते. परंतु चार ‌वर्षे उलटूनही हे मैदान मुलांना खेळण्यासाठी खुले झालेले नाही. या पार्श्वभूमीवर महेश बेडेकर यांनी पालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांना पत्र दिले आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!क्लिकवर!

एक शहर म्हणून आपण आपल्या मोकळ्या जागांकडे दुर्लक्ष केले असून आता लहान मुले आणि सामान्य नागरिकांसाठी खुल्या जागा उपलब्ध नाहीत. नौपाडा परिसरात मुलांना खेळण्यासाठी गावदेवी मैदान ही एकमेव जागा उपलब्ध होती. त्याठिकाणी भुमीगत वाहनतळ प्रकल्प उभारण्यात येत असून यामुळे हे मैदान चार वर्षांहून अधिक काळ मुलांसाठी बंद आहे. खूप विलंब झालेला गावदेवी मैदानातील भुमीगत वाहनतळ प्रकल्प त्वरित पूर्ण करावा आणि गावदेवी मैदानात पुवर्वत करावे, असे बेडेकर यांनी पत्रात म्हटले आहे. वाहनतळ सुविधेच्या विरोधात कधीच नव्हतो. पण, अशा प्रकल्पांमुळे मोकळ्या जागा गायब झाल्याबद्दल खरी चिंता होती. मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती आणि त्यावेळेस पालिकेने प्रतिज्ञापत्र दिले होते. त्यात भुमीगत वाहनतळाच्या वरती मैदान विकसित केले जाणार असल्याचे आश्वासन पालिकेने दिले होते.  त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून गावदेवी मैदान लवकरात लवकर मुलांसाठी व नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी बेडेकर यांनी केली आहे.

१३० चारचाकी आणि १३० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार

गावदेवी भूमिगत वाहनतळाच्या कामाची ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी नुकतीच पाहणी करून ‌‌वाहनतळ सुविधा, उद्वाहक सुविधेची पाहणी केली होती. अग्निशमन यंत्रणा, रंगरंगोटी ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले होते. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उद्वाहक संबंधित तपासणी परवानगी तसेच उर्वरित कामे पुढील १५ दिवसात पूर्ण करावीत असेही त्यांनी स्पष्ट केले होते. याठिकाणी १३० चारचाकी आणि १३० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय होणार आहे.

गावदेवी भूमिगत पार्किंगचे काम पुर्ण झाले असून मैदान पुर्ववत करण्याचे काम हाती घेतले होते. परंतु पावसामुळे चिखल होत आहे. त्यामुळे मैदान पुर्ववतचे काम करणे शक्य होत नाही. पाऊस थांबताच हे काम हाती घेऊन लवकरच मैदान खुले केले जाणार आहे.

संदिप माळवीअतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या