महामार्गावरील सेवा रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

कुजलेला भाजीपाला-मासळी यांसह जैववैद्यकीय कचऱ्याचाही समावेश

पडघ्याजवळ मुंबई-नाशिक महामार्गालगत सेवा रस्त्यावर टाकण्यात आलेला कचरा.

कुजलेला भाजीपाला-मासळी यांसह जैववैद्यकीय कचऱ्याचाही समावेश

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा गावाशेजारील महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर लगतच असलेल्या ग्रामपंचायती हद्दीतील गावांमधील कचरा आणून रिता केला जात असून यामुळे महामार्गाच्या एका बाजूला कचराभूमीची अवकळा आली आहे. या कचऱ्यामध्ये रुग्णालयांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याचाही समावेश असतो अशा तक्रारी आहेत.

भिवंडी, पडघा परिसरांत काही रुग्णालये करोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. या रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिकांचे व्यक्तिगत सुरक्षा साधने, उपचारानंतर निघालेला टाकाऊ वैद्यकीय कचरा महामार्गाच्या कडेला रिकामा केला जात आहे. याच ठिकाणी मासळी-मटण बाजारातील घाण आणून टाकली जाते. या कचऱ्याच्या ढिगावर कुत्री, कावळे, बगळे यांचा वावर आहे. कुत्री परिसरातील गावांमध्ये फिरतात. या कचऱ्याच्या ढिगावरील घाणीचा संसर्ग ते गाव परिसरात पसरवीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पडघा टोल नाका ते वाळकस गाव दरम्यान महामार्गालगत दोन ते तीन ठिकाणी महामार्गाच्या सेवा रस्त्यावर, कडेला बेकायदा पद्धतीने कचराभूमी तयार करण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण परिसरांत दररोज भाजीपाला घेऊन येणारे अहमदनगर, नाशिक भागांतील भाजीपाला विक्रेते जाताना शहरातील घाऊक विक्रेत्यांकडून सडका भाजीपाला घेऊन जातात आणि या भागात टाकत असल्याच्या तक्रारी आहेत. या कचऱ्याच्या ढिगांपासून काही अंतरावर पडघा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वाळकस ते पडघादरम्यानचा सेवारस्ता तर रस्त्यावरच कचरा टाकून बंद करण्यात आला आहे.

‘पडघ्यासाठी स्वतंत्र कचराभूमी आहे. पडघा ग्रामपंचायतीचा कचरा तेथे टाकला जातो. परिसरातील काही ग्रामपंचायतींमधील कचरा महामार्गालगत आणून टाकला जातो. सतत या ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने महामार्गालगत कचराभूमी तयार झाली आहे. यामध्ये जैववैद्यकीय कचरा पण टाकण्यात येत असेल तर ते अतिशय गंभीर आहे,’ असे पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच पराग पाटोळे यांनी सांगितले. कचरा फेकणाऱ्या काही वाहनांची छायाचित्रे आपल्याकडे असून ती पोलिसांना देऊन कारवाईची मागणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी दोन कर्मचारी नेमण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Garbage heap on service roads of the mumbai nashik highway zws