Marathi Actor On Thane Ghodbunder Road Condition : ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आहे. या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकार मंडळीदेखील या समस्येने वैतागले आहेत. अशातच झी मराठीवरील “तुला जपणार आहे” या मालिकेत काम करणारे अभिनेते मिलिंद फाटक यांनी सोशल मीडियावरून या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

फाटक दररोज अंधेरी-लोखंडवाला येथून ठाण्यातील ओवळा नाक्याजवळील स्टुडिओत शूटिंगसाठी येतात. सुरुवातीला हा प्रवास एका तासाभरात पूर्ण होत होता. मात्र आता रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की प्रवास भयंकर, जीवघेणा आणि यातनादायी ठरतो, असे त्यांनी सांगितले. “मीरा रोड, फाऊंटन हॉटेल सोडून ठाण्याकडे यायला लागलं की रस्ता उरलेलाच नाही; फक्त खड्डेच खड्डे आहेत. मोठे ट्रक्स आणि सर्व प्रकारची वाहने चालक जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून येतात. लोकांना पर्यायच नाही, कारण त्यांना पैसे कमवायचे आहेत आणि जगायचं आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, घोडबंदर रस्ता मीरा-भाईंदर टर्नपासून ठाणे महापालिकेपर्यंत जोडतो. या रस्त्याचा काही भाग ठाणे महापालिका, काही भाग मीरा-भाईंदर महापालिका तर मधला भाग एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो. तसेच जंगल परिसरातून जाणाऱ्या पट्ट्यातील कामासाठी फॉरेस्ट विभागाची परवानगी आवश्यक असते. परिणामी तिन्ही संस्था जबाबदारी झटकत असल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे असे त्यांनी सांगितले.

फाटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना विनंती केली आहे की, “प्रवाशांना प्रवासासाठी चांगला रस्ता मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तो हक्क सरकारने द्यायलाच हवा. त्यामुळे कृपया जे काही करता येईल ते लवकरात लवकर करा अशी विनंती त्यांनी केली.

पुढे ते असं म्हणतात, “आता हा कोण मिलिंद फाटक? काय तरी बोलत आहे? कशाला लक्ष द्यायचं? असं बोलून दुर्लक्ष करणार असाल तर माझं काही म्हणणं नाही. मला प्रवास करायचाच आहे, मला पैसे कमवायचेच आहेत. मला मुंबईसारख्या शहरात जगायचंच आहे. त्यामुळे हा सगळा यातनांनी भरलेला प्रवास करीत मी शूटिंगला येणार आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहणार. त्यांना हसवत राहणार, त्यांना रडवत राहणार… जरी मी रडत रडत प्रवास करीत असलो तरी… पण कृपया या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या.”