Ghodbunder Road : ठाणे : मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्वाचा मानला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांच्या वाहने वाहतूक करतात. या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मार्ग अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून ही कोंडी सोडविण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी काही उपाय सुचवून डिसेंबरपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना केल्या.
घोडबंदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनासह परिसरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावरील फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट पर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच मीरा-भाईंदर महापालिकेला हस्तांतरित केला आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. घाट परिसरातील चढणीवरच खड्डे पडत असल्याने वाहनांचा वेग मंदावून प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाण्याहून घोडबंदर कडे जाणाऱ्या मार्केटच्या दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने त्यांना घोडबंदर वरून ठाण्याकडे येणार मार्गीकेचे काम करणे शक्य झाले नव्हते. या मार्गाची दुरावस्था झाली झाल्याने या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावत होती. वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात. गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई-अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसेच, मिरारोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होतो. त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारे पावसाचे पाणी यामुळे कोंडीत भर पडत आहे. या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले.
घोडबंदर कोंडीचे कारण गायमुख घाट रस्ता नाहीच
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसराचा रस्ता मीरा- भाईंदर महापालिकेच्या अखत्यारीत येतो. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सातत्याने करण्यात येत आहे. परंतु पाऊस पडल्यानंतर हा रस्ता खराब होतो. या रस्त्यामुळे कोंडी होते, असे सातत्याने सांगितले जात आहे. प्रत्यक्षात तसे चित्र नसून कोंडीचे कारण वेगळे आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता सुस्थितीत होता, त्यावेळीही वाहतूक कोंडी होत होती. कापूरबावडी ते गायमुख पर्यंत वाहने सुसाट येतात, पण गायमुख वळणावर रस्ता अरुंद असल्याने कोंडी होते आणि वाहनांच्या रांगा लागतात. अवजड वाहतुकीमुळे कोंडी वाढते, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत गुरुवारी झालेल्या बैठकीत सांगितले.
सरनाईकांनी सुचवले हे उपाय
घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे डिसेंबर पर्यंत या मार्गावर रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात यावी. तसेच त्या वेळे व्यतिरिक्त दिवसा होणारी वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात यावी, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना बैठकीत दिले. त्यावर शिरसाट यांनी याबाबत तातडीने नोटीस काढून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.