ठाणे : पर्यटन कंपन्यांच्या संकेतस्थळावर खोटे रेटींग दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील असे सांगून काही भामट्यांनी एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. फसवणूक झालेले व्यक्ती घोडबंदर भागात राहतात. ते एका आयटी कंपनीत कामाला आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मोबाईलमधील टेलिग्राम ॲपवर अंजली शर्मा नावाने एक संदेश आला होता. पर्यटन घडवून आणणाऱ्या टूरिस्ट कंपन्यांच्या संकेतस्थळावर खोटे रेटिंग दिल्यास घरबसल्या दिवसाला १ हजार ते दिड हजार रुपये मिळतील. असे या संदेशात सांगण्यात आले होते.

तरूणाने या कामास सहमती दर्शविल्यानंतर त्याला https://www-tour-rating.com नावाने संकेतस्थळ प्राप्त झाले. त्यानंतर या तरूणाने त्याच्या बॅंक खात्याची माहिती या संकेतस्थळावर भरली. सुरूवातीला कंपनीने दिलेला एक टास्क पूर्ण केला. त्यांच्या खात्यात सुमारे ७५० रुपये आले. त्यानंतर कंपनीने त्यांना टूरिस्ट कंपनीसोबत बॅंक व्यवहार झाल्याचे दाखविण्यासाठी तसेच पर्यटन करू इच्छिणाऱ्यांना विश्वास बसावा म्हणून दोन हाॅटेलसाठी २३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी हा टास्क पूर्ण करून रेटींग दिली असता त्यांच्या खात्यात २७ हजार रुपये आले. त्यानंतर पैसे भरण्याची रक्कम कंपनीने ७ ते ८ लाख रुपयांवर नेली.

हेही वाचा : राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त; नव्या तरुणांना दिली जाणार संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यामुळे तरूणाने टप्प्याटप्प्याने २७ लाख ५० हजार रुपये कंपनीकडे जमा केले. परंतु कंपनीने जमा करण्याची रक्कम सातत्याने वाढवू लागल्याने तरूणाने रेटींग देण्याचे काम बंद केले. तरूणाने पैसे मागितले असता कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. त्यानंतर कंपनीने जमा झालेली रक्कमही गोठविली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.