जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात ५० टक्के पावसाची नोंद

धरणक्षेत्रातील जलसाठा वाढला; ठाणे शहरात सर्वाधिक पाऊस

ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत सुमारे ४९ टक्के म्हणजेच निम्म्या पावसाची नोंद केवळ जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात झाली. त्यामुळे जिल्ह्य़ातील पाण्याच्या साठय़ामध्ये कमालीची वाढ झाल्याने यंदा ‘सुख’वर्षांव झाल्याचेच चित्र आहे. धरणक्षेत्रामध्येही पावसाने दमदार हजेरी लावल्याने अवघ्या जुलैच्या पहिल्या चार दिवसांमध्येच धरणे ३० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. ठाणे जिल्ह्य़ातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाऊस ठाणे शहरात झाला असून हे प्रमाण सुमारे १,२२१ मिमी (४९ टक्के) आहे, तर इतर तालुक्यांमधील पावसाची सरासरी मागील वर्षीच्या पावसापेक्षाही जास्त आहे.

ठाण्याच्या ग्रामीण भागातून शहरी भागात येणाऱ्या पावसाने यंदा उलटा मार्ग अवलंबून प्रथम शहरी भागात हजेरी लावलेला पाऊस त्यानंतर धरणक्षेत्राकडे वळला. त्यामुळे यंदा शहरी भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १ जून ते ३१ ऑक्टोबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी २,४६८ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी दमदार आगमन केलेल्या पावसाने जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात ठाण्यात १,२२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात या भागात केवळ ७९१ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदाच्या पावसाचे हे प्रमाण अधिकच मोठे आहे.
dam1

धरणांच्या तालुक्यात मात्र कमी पाऊस

धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत पावसाची स्थिती चांगली आहे. शहापुरात सरासरी २५५६.४० मिमी पाऊस पडत असतो. यंदा तो ५७० मिमी इतका म्हणजे २२ टक्के झाला.
dam2