मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाही ठाण्यातील तीन हात नाका येथील टिपटॉप प्लाझा सभागृहात मात्र तुफान गर्दी झाली होती. उपनगरीय रेल्वे सेवा ठप्प झाली असताना आणि रस्त्यांवर पाणी साचलेले असतानाही विद्यालंकार प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार हजेरी लावली होती. उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणाचा योग्य पर्याय जाणून घेण्याच्या मार्गात आडवा येऊ पाहणाऱ्या पावसालाही विद्यार्थ्यांनी सहज बाजूला सारले.
ठाण्यातील टिपटॉप प्लाझा सभागृहात भरवण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या मार्गदर्शन कार्यक्रमाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे विविध पर्याय, करिअरच्या वेगवेगळ्या वाटा, उपलब्ध शिक्षण संस्था अशा सर्वाची माहिती देणाऱ्या या कार्यक्रमासाठी भर पावसातही विद्यार्थी-पालक मोठय़ा संख्येने जमले होते. गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, ठाण्यातील लोकल सेवा तसेच रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मात्र, याचा विद्यार्थी आणि पालकांच्या निर्धारावर अजिबात परिणाम दिसला नाही. पावसातून भिजत, वाहतूक कोंडीतून वाट काढत त्यांनी टिपटॉप प्लाझा गाठलेच.
पालकांनी कधीही न अनुभवलेली क्षमता कल चाचणी, सॉफ्ट स्किल आदींचे मार्गदर्शन या कार्यक्रमात देण्यात आले. पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीच्या ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ नीलिमा आपटे यांनी आवडीच्या क्षेत्राचे नियोजन कसे करावे यावर भर देत विद्यार्थ्यांना क्षमता कल चाचणीचे (अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट) महत्त्व सांगितले. तसेच दुसऱ्या सदरात गौरी खेर यांनी सुरुवातीला आवडीच्या क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर काम करून मगच ते करिअर पुढे जमते की नाही हे ठरवावे, असा सल्ला दिला. करिअरची निवड अतिशय विचारपूर्वक करा, असे ज्येष्ठ करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी सांगितले.
करिअर निवडीचे नियोजन व करिअरच्या वेगवेगळ्या संधी वक्त्यांकडून जाणून घेतल्यावर प्रदर्शनात विविध महाविद्यालय तसेच विषय शाखांची माहिती मिळाल्याने पालक तसेच विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले, तर सुजाण पालकांची आपल्या पाल्याच्या करिअरसाठीची धडपड या गर्दीतून दिसून येते, असे मत टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शाह यांनी व्यक्त केले.

पालक म्हणतात..
अभियांत्रिकी, विज्ञान आदी शाखांविषयी सविस्तर माहिती मिळाली. अभियांत्रिकी अभ्यासक्रम व त्याबद्दलचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील करिअर संधींचा परिचय करून देणाऱ्या ‘लोकसत्ता’चे या उपक्रमाबद्दल मन:पूर्वक आभार.
– दीपा पारकर, ठाणे</p>

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक लहान-मोठय़ा कोर्सेसची माहिती मिळाली. तसेच गौरी खेर यांचे सॉफ्ट स्किल्सबद्दलचे मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी अत्यंत मोलाचे आहे. प्रदर्शनातून थेट शिक्षण संस्थांशी संवाद साधायला मिळाल्याने त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा होईल.
– अपर्णा भोसले, सायन, मुंबई</p>

पालक-विद्यार्थी संवाद वाढेल
करिअरची निवड करताना मुलांसोबत पालकही संभ्रमात असतात. मुलांना करिअरची निवड करण्यासाठी पालकांचे मार्गदर्शन व पालकांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. याची जाणीव या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. पालकांनी मुलांचा कल जाणून घेऊन त्यानुसार पुढील वाटचालीकडे लक्ष दिले पाहिजे. परंतु, पालकांशी पाल्याने याबाबत संवाद साधल्यास करिअर निवडीचा प्रश्न त्याच्यासाठी सोपा जाईल. सर्वच वक्त्यांनी हा मुद्दा मांडल्याने विद्यार्थी-पालक संवाद वाढीस लागण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
गणेश अंबिके, ठाणे

विद्यार्थी म्हणतात..
सध्या मी वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षा देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला मार्गदर्शनाची गरज होती.
अत्यंत चोख मार्गदर्शन मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभले. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे
मनापासून आभार.
पालकांना विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचा उपयोग होत आहे.
तसेच येथे अनेक शैक्षणिक संस्थांच्या स्टॉल्समुळे एकाच छताखाली
अनेक गोष्टींची माहिती
मिळाली.
– मानसी राऊत, बेडेकर महाविद्यालय, ठाणे

पदवी शिक्षण झाल्यानंतर पुढे काय, असा प्रश्न पडला होता. परंतु आपली आवड जाणून त्याप्रमाणे करिअर ठरवावे, असे या कार्यक्रमातून समजले. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले वक्ते अत्यंत चांगले असून त्यांच्या मार्गदर्शनाने करिअरच्या नव्या वाटा मला समजलेल्या आहेत. ‘लोकसत्ता’च्या साहाय्याने मला माझ्या यशाचा एक नवा मार्ग गवसला यासाठी खूप धन्यवाद.
– अक्षय गंभरे, ठाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसामान्य कोर्सेसची माहिती अगदी सहज उपलब्ध असते. परंतु नेहमीच काही तरी वेगळे करू पाहणाऱ्या आजच्या पिढीचा कल नव्याने आलेल्या कोर्सेसकडे अधिक आहे. ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमामुळे करिअरच्या अनेक नव्या वाटांचा परिचय झाला.
वेदवती ठिपसे, ठाणे