कल्याण जवळील दुर्गाडी खाडी किनारी बेसुमार वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. अधिकाऱ्यांनी वाळू माफियांची वाळू उपशाची सर्व सामग्री जाळून टाकली. मात्र, अंधाराचा फायदा घेत वाळू माफिये अधिकाऱ्यांच्या तावडीतून सूटले. माफियांची बार्ज, सक्शन पंप उल्हास खाडीत बुडविण्यात आले, अशी माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी दिली. या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा- १७५ पोलीस निरीक्षकांची अखेर पदोन्नती
उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांना कल्याण जवळील दुर्गाडी खाडी किनाऱ्या जवळ गुरुवारी रात्री बेकायदा वाळू उपसा माफियांनी सुरू केला आहे, अशी गुप्त माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती तात्काळ तहसीलदार जयराज देशमुख यांना दिली. तहसीलदार देशमुख, नायब तहसीलदार देशमुख, मंडल अधिकारी, तलाठी यांनी जेसीबी, कटर, वेल्डिंग, तोडकाम साहित्य कारवाई पथकासह खाडी किनारी धाव घेतली. कारवाई पथक येताच सक्शन पंप, बार्जवरुन उड्या मारुन वाळू माफिया अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
या पथकाने अंधार असुनही इतर बोटींचा वापर करुन खाडीत जाऊन सक्शन पंप, बार्ज दोराने ओढत खाडी किनारी आणले. या उपसा बोटींना वेल्डिंग यंत्राने छिद्र पाडून ते खाडीत बुडविण्यात आले. बोटीवरील इंधनाचा वापर करुन काही बार्ज, सक्शन पंप, उपसा बोटी, सामग्री पेटून देण्यात आले. अचानक झालेल्या या कारवाईने माफियांची पळापळ झाली.
हेही वाचा- मिनाताई ठाकरे चौक उड्डाणपूलावर ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी
दुर्गाडी खाडी किनारी एक हजार ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला. ही सर्व वाळू जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खाडीत लोटून देण्यात आली. वाळू उपशातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने महसूल विभागाच्या सतत कारवाया सुरु असूनही वाळू माफिया त्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे. वाळू माफियांना पकडून त्यांच्या फौजदारी कारवाईच्या माध्यमातून जबर दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होईल यादृष्टीन महसूल प्रशासन प्रयत्न करत आहे. परंतु कारवाईच्या वेळी वाळू माफिया खाडीत उड्या मारुन पळत असल्याने ते पोलीस, महसूल अधिकाऱ्यांच्या हाती लागत नाहीत. मुंब्रा, डोंबिवली, कोपर, कल्याण, कोन, दिवा खाडी किनारे वाळू माफियांनी बेकायदा वाळू उपसा करुन सपाट केले आहेत. महापुराच्या काळात या सपाटीचा कल्याण, दिवा, डोंबिवली शहरांना मोठा धोका निर्माण होणार आहे. उल्हास खाडी किनारची जैवविविधता नष्ट करण्याचे काम वाळू तस्करांकडून सुरू असल्याने पर्यावरणप्रेमी नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा- ब्रम्हाळा तलावाच्या आवारात गर्दुल्ल्यांचा वावर जेष्ठ नागरिक हैराण
“ दुर्गाडी खाडी किनारी पाच बार्ज जाळले. तीन सक्शन पंप खाडीत बुडविण्यात आले आहेत. एक हजार ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. वाळू माफियांवर आता रात्रीच्या वेळेत कारवाई करण्याचे नियोजन केले जात आहे”, अशी माहिती कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली.