ठाणे : ठाणे शहरा लगत असलेल्या दिवा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दिवा येथील आगासन भागात हा पुतळा उभारला जाणार आहे.
दिवा शहरात मागील काही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. या भागात महाराजांचे स्मारक व्हावे अशी मागणी होती. दिवा शहर कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो. या लोकसभा मतदारसंघाचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर दिव्यातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे लवकरच आगसन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा सांस्कृतिक अभिमानाच्या प्रतिका समवेतच स्थानिक नागरिकांमध्ये प्रेरणादायी संदेश देणारा ठरेल. तर आगासन रोड परिसरातील या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दिवा शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास शिंदे गटाने व्यक्त केला.