कल्याण: कल्याण येथील पश्चिमेतील घास बाजारातील एका इमारती मधील सदनिकेला मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ७० वर्षाची आजी आणि २२ वर्षाच्या तिच्या नातीचा होरपळून मृत्यू झाला. खातीजा हसम माईमकर (७०), इब्रा रौफ शेख (२२) अशी मृतांची नावे आहेत.

कल्याण पश्चिमेतील घास बाजारातील अण्णासाहेब वर्तक रस्त्यावरील शफिक खाटी मिठी इमारतीमध्ये तिसऱ्या माळ्यावर खातीजा आणि इब्रा या आजी, नाती राहत होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास या भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा सुरू झाल्यावर माईमकर यांच्या घराच्या ओटीच्या भागाला अचानक आग लागली. थंडीचे दिवस असल्याने आजी खातीजा, नात इब्रा शयन गृहात गाढ झोपेत होत्या.

हेही वाचा >>> ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”

घरातील ओटीच्या भागाला भीषण आग लागली हे त्यांना समजले नाही. काही वेळाने आजी, नातीला झोपेत असताना घरात धूर पसरल्याचे जाणवले. नात इब्राने उठून पाहिले तर घरात धूर आणि आगीच्या ज्वाला पसरल्या होत्या. तिने आजीला तात्काळ उठविले. त्यांनी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. ओटीच्या भागात भीषण आग, धूर असल्याने त्या शयन गृहात कोंडल्या. बंदिस्त घरात धूर कोंडल्याने आणि आगीने भीषण रुप धारण केल्याने त्या गुदमरुन आणि होरपळून मरण पावल्या. त्यांना बचावाची संधी मिळाली नाही.

हेही वाचा >>> डोंबिवली : शालेय जीवनापासून वाहतूक नियमांचा स्वीकार करा, परिवहन अधिकारी रमेश कल्लुलकर यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरातील सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. बंदिस्त घरात आग लागल्याने रस्त्यावरुन वाहन चालक किंवा पादचाऱ्याला आग दिसले नाही. परिसरातील शेजाऱ्यांना उशिरा धूर, आगीची जाणीव झाली. त्यावेळी तात्काळ अग्निशमन दलाला कळविण्यात आले. जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले, तोपर्यंत घराची राखरांगोळी झाली होती. आजी, नातीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी काढला आहे. बाजारपेठ पोलीस याप्रकरणाचा स्वतंत्र तपास करत आहेत. या दुर्घटनेने कल्याणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.