ठाणे : वसई येथील राहत्या घरातच बंदुका बनवून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली. दयानंद भंगाडे (४२) आणि चंद्रदेव सरोज (४१) अशी दोघांची नावे असून त्यांच्याकडून १० बंदुका आणि ११ काडतुसे जप्त केली आहेत. प्राणी- पक्ष्यांच्या शिकारीसाठी या बंदुकींचा वापर केला जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

घोडबंदर येथील गायमुख भागात एकजण बंदुकांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे सापळा रचून दयानंद याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे दोन बंदुक आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता चंद्रदेव या साथीदारच्या मदतीने लेथ मशीनवर या बंदुका तयार केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चंद्रदेव यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून आठ बंदुका जप्त केल्या.