डोंबिवली – डोंबिवली जवळील भोपर गावातील एका ४३ वर्षाच्या शेतकऱ्याला किरकोळ कारणावरून गावातील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत गावातील एका ग्रामस्थाने मारहाण केली. त्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्याला मारून टाकण्याच्या उद्देशाने ग्रामस्थाने घरातून वडिलांची बंदूक आणली. त्या शेतकऱ्याला मारून टाकण्याची धमकी देत बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणी भोपर गावातील शेतकरी महेंद्र गंगाराम पाटील (४३) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी महेंद्र पाटील यांनी भोपर गावातील रहिवासी योगेश अस्मान मढवी यांच्या विरुध्द मारहाण आणि शस्त्राने धाक दाखविल्याची तक्रार केली आहे.
महेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालातील तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी हुनमान जयंती होती. भोपर गावातील हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते. या मिरवणुकीत आपणही इतरांप्रमाणे नाचत होतो. यावेळी योगेश मढवी यांनी आपणास पाठीमागून जोराचा धक्का दिला. आपणास दुखापत झाली.
या घटनेनंतर शेतकरी महेंद्र पाटील हनुमान मंदिरात दुसऱ्या दिवशी सकाळी देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी योगेश मढवी यांनी शेतकरी महेंद्र यांना पु्न्हा आवाज देऊन थांबवले. आणि ‘काय रे तुला रात्रीचा मार कमी पडला आहे का,’ असा प्रश्न केला. यावेळी या मारहाण प्रकरणामुळे त्रस्त महेंद्र पाटील यांनी योगेश यांना ‘दादा तुम्ही मला निष्कारण का त्रास देत आहात. मी तुम्हाला काही केले नसताना तुम्ही मला असेच त्रास देत असाल तर मी आत्महत्या करतो,’ असे उद्विग्न अवस्थेत बोलले. यावेळी योगेश मढवी यांनी महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘अरे तु कशाला आत्महत्या करतोस. मीच तुला ठार मारतो थांंब.’ असे बोलून योगेश मढवी आपल्या घरी गेला. त्यांनी वडिलांची बंदूक सार्वजनिक ठिकाणी आपण उभा होतो त्या ठिकाणी आणली. आपणास पाहून योगेश यांनी बंदुकीतून हवेत गोळीबार केला. महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘आता तुम्हाला मारूनच टाकतो,’ अशी धमकी दिली. महेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत हा सर्व तपशील दिला आहे.
या गोळीबार घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या आदेशावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक के. पाटील तपास करत आहेत. याप्रकरणात योगेश मढवी यांना अटक करण्यात आलेली नाही.