डोंबिवली – दुचाकीच्या आसना खालील सामान पेटीत गुटख्याचा साठा ठेऊन तो डोंबिवली, कल्याण परिसरातील पान टपरी चालकांना चोरुन विकणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील व्दारली येथील एका इसमाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.काटई-बदलापूर रस्त्यावरील म्हाडा वसाहती जवळील आवणी पान शाॅपमध्ये गुटख्याची विक्री करत असताना इसम गस्तीवरील पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दुचाकीच्या सामान पेटीत गुटखा ठेऊन त्याची डोंबिवली परिसरातील पान टपऱ्यांवर विक्री करणाऱ्या इसमाचे नाव सुनीलकुमार मिश्रा आहे. तो अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहतो, असे पोलिसांनी सांगितले. मिश्राकडून गुटखा खरेदी करत असताना खोणी गावाजवळील म्हाडा वसाहतील जवळील आवणी पान टपरीचा चालक बृजुलकुमार इन्दीपकुमार सिंग (२७) पोलिसांच्या सापळ्यात अडकला.
एक अज्ञात इसम मानपाडा पोलीस ठाणे हद्द परिसरात दुचाकीवर बसून गुटख्याची विक्री करत आहे, अशी माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. पोलीस अशा संशयास्पद दुचाकी चालकाच्या मागावर होते. शुक्रवारी दुपारी मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार शांताराम कसबे आणि त्यांचे सहकारी खोणी भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक दुचाकी स्वार संशयास्पदरित्या हालचाली करत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला थांबवून त्याला कोठे चालला आहे. तु कोठे राहतो, अशी विचारणा केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याच्या दुचाकीची पोलिसांनी झडती घेतली. त्यामध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. तो साठा किरकोळ माध्यमातून पानटपरी चालकांना विकत असल्याची कबुली आरोपी मिश्राने पोलिसांना दिली. गुटखा विक्रेता मिश्रा आणि आवणी पान टपरीचा मालक सिंग यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर हवालदार कसबे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
मागील सहा महिन्याच्या काळात असे प्रकार ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, पत्रीपूल भागातील पान टपरींवर सुरू होते. ते टिळकनगर पोलिसांनी अचानक छापे मारुन बंद केले होते.