कल्याण शीळ रस्त्यावर सोनारपाडा गाव हद्दीत एका होन्डा सीटी कारमधून मानपाडा पोलिसांनी पाच लाख १६ हजार रुपये किमतीचा चोरुन चालविलेला गुटखा रविवारी जप्त केला. याप्रकरणात भिवंडीतील एका रहिवाशाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मो. मिरज मो. तय्यब अन्सारी (२५, रा. काबा रोड, भारत नगर, भिवंडी) असे आरोपीचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी सांगितले, मीरज तय्यब रविवारी दुपारी एका होन्डा सिटी कार मधून पाच लाख १६ हजार रुपये किमतीचा गुटखा घेऊन चालला होता.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील कुंभारखाण पाड्यातील बेकायदा शिव सावली गृहप्रकल्पाला ‘महारेरा’ची नोटीस

याविषयी सोनारपाडा येथील रहिवासी विनोद गुप्ता आणि मो. मिरज मो. तय्यब यांचे मोबाईलवर संभाषण झाले होते. मिरज शीळ रस्त्यावरील स्वाद हाॅटल परिसरात शंकरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येताच या भागात गस्तीवर असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे, हवालदार विजय आव्हाड यांना मोटारीच्या हालचाली विषयी संशय आला. त्यांनी मोटारीची झडती घेतली.त्यावेळी त्यामध्ये गुटख्याच्या पिशव्या आढळून आल्या. या पिशव्या कोठे नेण्यात येत आहे याची माहिती चालक मिरज देऊ शकला नाही. त्यामुळे वाहनासह गुटखा जप्त करण्यात आला.अन्न व सुरक्षा कलम आणि गुटखा प्रतिबंधक कायद्याने मो. मिरज विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापर्वी मो. मिरजने अशाप्रकारे कोठे गुटखा विक्री केली आहे. त्याने तो कोठुन आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत.