ठाणे जिल्हा रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवडय़ाच्या दर बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘अपंगत्वाचा दाखला’ आणि ‘सवलत प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी विविध वयोगटातील अपंगांसह त्यांच्या पालकांचीही विशेष गर्दी झालेली दिसून येते. मात्र प्रशासनाचा भोंगळ कारभार, कर्मचाऱ्यांची उर्मट वृत्ती आणि त्रिसदस्यीय डॉक्टरांचा एकमेकांशी नसणारा ताळमेळ आदींमुळे जिल्ह्य़ाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अपंगांना पिण्याच्या घोटभर पाण्यापासून बसण्यासाठीही तिष्ठत उभे राहावे लागते.

पालघर जिल्हा स्वतंत्र झाला असला तरी तेथील अपंगांनाही अद्याप दाखल्यांसाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात यावे लागते. जव्हार, वाडा, मोखाडा दुर्गम भागातून आदिवासी दाखल्यांसाठी येथे येतात. त्याचबरोबर शहरी भागातील अपंगही दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात अपंगत्व दाखल्यासाठी येत असतात. सकाळी दहापासून अपंगत्व दाखला देण्याची प्रक्रिया सुरू होत असली तरीही तांत्रिक कामांसाठी अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर, विशेष मुले आणि त्यांचे पालक पहाटे सातपासूनच रुग्णालय परिसरात दाखल होतात. मात्र अपंगांबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांची मानसिकता, पुरेशा माहितीचा अभाव आदींमुळे पालकांसह अपंगांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातो. त्यातच गर्दीच्या रेटय़ामुळे बसण्यास पुरेशी जागा नाही, पिण्याच्या पाण्याची सोयही येथे उपलब्ध नसल्याने येथे येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, अशी माहिती येथे येणाऱ्या अपंग व्यक्तींनी दिली आहे.

त्रिसदस्यीय समितीसाठी पायपीट

अपंगत्वाचा दाखला देण्यासाठी त्रिसदस्यीय डॉक्टरांच्या कमिटीसमोर अपंगांना बसावे लागते. मात्र आठवडय़ातून केवळ बुधवार दाखला देण्यासाठी राखीव असतो. नेमक्या त्याच दिवशी कमिटीवरील डॉक्टर बैठकांमध्ये व्यस्त असल्याने अर्जदारांचा वेळ आणि शक्ती दोन्ही वाया जातात. तसेच डॉक्टर नेमके कुठे बसले आहेत, हेही अपंगांना माहिती नसते.

ठाणे जिल्ह्य़ाच्या विविध भागांतून दाखल्यासाठी अपंग येतात. मात्र योग्य माहितीफलकांचा इथे अभाव असल्याने त्यांना चकरा माराव्या लागतात. प्रशासनाने तशी सोय केल्यास वेळ आणि श्रम वाचतील.

– नमिता रावत, विशेष मुलाच्या पालक, ठाणे

अपंगांना सोयीसाठी तळमजल्यावर तपासणीची सोय करण्यात आली आहे. तसेच दर बुधवारी येणाऱ्या प्रत्येकाला सायंकाळी ६ वाजेपर्यंत दाखला वाटण्याचे काम येथे सुरू असते.

– केम्पी पाटील, शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handicapped face problem at thane district hospital
First published on: 25-01-2017 at 01:30 IST