डोक्याला मार लागल्याने एक कर्मचारी गंभीर जखमी; रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात बुधवारी दुपारी फेरीवाल्यांना हटविण्याचे काम सुरू असताना संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी गटबाजी करून सामूहिकपणे ‘क’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्यासह फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी राजेश पेठेकर यांना बेदम मारहाण केली. बांबूची उपट पेठेकर यांच्या डोक्यात फेरीवाल्यांनी मारल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

‘क’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे व त्यांच्या पथकातील राजेश पेठेकर, मोहन केणे, यतीश माळी, संतोष जाधव, सुभाष म्हात्रे हे कल्याण पश्चिमेतील बोरगावकरवाडी, दीपक हॉटेल भागातील रस्ते, पदपथावर बसलेले फेरीवाले हटविण्याचे काम करीत होते. रस्त्यावर बांबूचा मांडव उभारून काही फेरीवाले साहित्य विक्री करीत होते. वानखेडे यांनी फेरीवाल्यांना मांडव काढण्यास सांगितले. तरीही फेरीवाले मांडव काढण्यास तयार नव्हते. पालिका कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन मांडव तोडण्यास सुरुवात करताच मांडव मालक फेरीवाला सलीम व त्याचा मुलगा याने वानखेडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. सलीमने आपल्या साथीदार फेरीवाल्यांना घटनास्थळी बोलावले. सात ते आठ फेरीवाल्यांच्या टोळक्याने प्रभाग अधिकारी वानखेडे यांना धक्काबुक्की केली. पेठेकर या कर्मचाऱ्याच्या डोक्यात एका फेरीवाल्याने बांबूची जोराची उपट मारल्याने ते रक्तबंबाळ झाले. जावेद, सोहेब, आवेश, मुर्गी व त्यांच्या इतर साथीदारांनी ही मारहाण केली असल्याची तक्रार वानखेडे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे.

पालिका कर्मचारी, पोलीस, रेल्वे पोलीस, दादा, भाई यांना आम्ही हप्ते देतो तरी तुम्ही आमच्यावर कारवाई कशी करता, अशी भाषा या फेरीवाल्यांकडून मारहाण करताना करण्यात येत होती. काही लोकप्रतिनिधी पडद्यामागून या फेरीवाल्यांकडून दरमहा हप्ता वसुली करीत असल्याने फेरीवाले रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नसल्याचे समजते.