दमदार पाऊस झाल्यानंतरही कूपनलिकेतील पाण्यावर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाला की वीज येईपर्यंत महिलांना पाण्याच्या टाकीजवळ ताटकळत बसावे लागते.. ही परिस्थिती आहे, ‘आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत’ दत्तक घेतलेल्या पोसरी गावची. हे गाव कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील भाजप पुरस्कृत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी दत्तक घेतले असून गावात पाच वर्षांत कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने गाव नागरी समस्यांनी ग्रासले आहे.

अंबरनाथ तालुक्यात मलंग गडाच्या पायथ्याशी १०० उंबऱ्यांचे ८०० लोकवस्तीचे पोसरी गाव आहे. नेवाळी पाडय़ावरून पोसरी गावात जाईपर्यंत रस्त्याचा काही भाग सोडला तर खड्डय़ांतून आदळआपट करीत जावे लागते. रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधारात चाचपडत रात्रीच्या वेळेत या भागातील चाकरमान्यांना घर गाठावे लागते. गावात आरोग्यविषयक सुविधा नाहीत. रात्रीच्या वेळेत कोणी आजारी पडले तर कल्याण, डोंबिवलीचा रस्ता धरावा लागतो.

गावातून कल्याणकडे जाण्यासाठी ‘केडीएमटी’ची बससेवा दर एक तासाने उपलब्ध व्हावी, अशी मागणी आमदारांकडे गावातील तरुणांनी केली. ते प्रयत्न करण्याऐवजी गायकवाड यांनी ‘तुम्ही मला एक अर्ज लिहून द्या; मग मी प्रयत्न करतो’, असे उत्तर दिले, असे तरुणांनी सांगितले. गावात तीन तासांनी बस येते.

वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंत पाण्यासाठी ताटकळत राहावे लागते. नेवाळी फाटा येथून गेलेल्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून गावाला नळजोडणी देण्याची मागणी अनेक वर्षे केली जात आहे. आमदारांना हा विषय सांगितला आहे, पण त्याची दखल घेतली जात नाही, असे विश्वनाथ गार्डी या शेतकऱ्याने सांगितले.

एकच सिमेंट रस्ता

पोसरी गावापासून काही अंतरावर असलेल्या शेलार कातकरी वाडीत आमदार गायकवाड यांनी १० लाख खर्च करून सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून काँक्रीटचा रस्ता बांधला आहे. या रस्त्याच्या आजूबाजूच्या रस्त्यांची खड्डय़ात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था आहे. पोसरी गावातील रस्ता काँक्रीटचा ही फक्त गावविकासाची जमेची बाजू. जिल्हा परिषदेकडील यादीत माहिती घेतली तर त्यात रिकामे रकाने आढळून आले.

पोसरी दत्तक गावात आपण अनेक विकासकामे केली आहेत. काँक्रीट रस्ते, समाज मंदिर व इतर महत्त्वाच्या नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आदर्श गाव म्हणून मिळालेला सर्व निधी या गावासाठी खर्च केला. केलेल्या सुविधांविषयी ग्रामस्थांमध्ये समाधान आहे. जी कामे मंजूर आहेत ती मार्गी लावली जात आहेत. प्रगतिपथावर आहेत ती पूर्ण केली जाणार आहेत. – गणपत गायकवाड, आमदार, कल्याण पूर्व विधानसभा